Monday, December 29, 2025

स्नेहल जाधवांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

स्नेहल जाधवांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना विश्वासात न घेतल्याने त्या नाराज असल्याची माहिती आहे. स्नेहल जाधव या आपल्या कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता असून त्या शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील असे समजते. आपल्या राजकीय कारकिर्दीत स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७ तसेच १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून यशस्वी प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग चार वेळा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकूनही मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने स्नेहल जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संपर्क ठेवत विकासकामांचा पाठपुरावा करणाऱ्या स्नेहल जाधव यांना पक्षाकडून अपेक्षित सन्मान व न्याय न मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या राजीनाम्यामुळे वॉर्ड क्रमांक १९२ सह मुंबईच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा