पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४,१८६ घरांच्या सोडतीसाठी लवकरच तारीख जाहिर होणार असल्याचे संकेत मिळले आहेत. इच्छुक नागरिकांना ३० नोव्हेंबर, २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घरांची सोडत रखडली आहे. मात्र म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो अर्जदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकतीच निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत आहेत.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन आचारसंहितेच्या काळात सोडत काढण्यास परवानगी देण्याची विनंती केली. ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया असून, अर्ज भरण्याची आणि छाननीची सर्व कामे आचारसंहितेपूर्वीच पूर्ण झाली आहेत, असे त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. यावर निवडणूक आयोगाने मुख्य सचिव आणि गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांशी चर्चा करून येत्या २-३ दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड विश्वात एक चेहरा सक्रिय आहे. मात्र त्याच्या आजवरच्या भुमिकांमुळे तो चर्चेत आला नसला तरी २०२५ मध्ये त्याने बॉलीवूडवर ...
म्हाडाच्या या लॉटरीसाठी ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन सोडत काढली जाणार होती. मात्र आचारसंहितेमुळे खोळंबा झाल्याने सप्टेंबर महिन्यापासून म्हाडाकडे हजारो अर्जदारांची अनामत रक्कम अडकून पडली आहे. अनेक सर्वसामान्यांनी कर्ज काढून किंवा क्रेडिट कार्डवरून पैसे भरले आहेत, ज्यावर आता त्यांना व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सोशल मीडियावरही म्हाडाच्या या विलंबावर कडाडून टीका होत आहे. सोडत काढणे शक्य नसेल तर रक्कमेवर व्याज द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या सोडतीत चार प्रमुख गटांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत १६८३ घरांचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत २९९ घरे उपलब्ध आहेत. १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत पीएमआरडीए हद्दीत ८६४ घरे देण्यात आली आहेत. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्रातील ३२२२ घरांचा समावेश आहे.