ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता
नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या तयारीला यंदा अडथळा येण्याची शक्यता आहे. कारण बुधवार, (३१ डिसेंबर) रोजी फूड डिलिव्हरी व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या गिग वर्कर्सनी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन वर्षाअखेरीस स्विगी, झोमॅटो, झेप्टो यांसारख्या ऑनलाइन सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी नुकतेच संयुक्त निवेदन जारी करत ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली. कामाची खालावलेली स्थिती, कमी होत जाणारी कमाई आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
सण-उत्सव आणि विशेषतः वर्षाअखेरीस डिलिव्हरी कामगार हे ऑनलाइन अर्थव्यवस्थेचा कणा असतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांना दीर्घ कामाचे तास, अपुरा मोबदला आणि असुरक्षित कामाची परिस्थिती यांचा सामना करावा लागतो. अनेक वेळा डिलिव्हरी करताना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, अपघाताचा धोका वाढतो, तसेच काही ठिकाणी ग्राहकांकडूनही असंवेदनशील वागणूक मिळते, असा आरोप संघटनांनी केला आहे. १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या अति स्पर्धात्मक संकल्पनेमुळे कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचे सांगत ही सेवा तत्काळ बंद करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे. यासोबतच अपघात विमा, सुरक्षा उपकरणांची सुधारणा, अनिवार्य विश्रांती वेळ, तसेच कामाचे तास आणि मोबदला यामध्ये समतोल राखण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संपात देशभरातील मेट्रो शहरांसह प्रमुख शहरांमधील गिग वर्कर्स सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी ऑनलाइन फूड डिलिव्हरी व ई-कॉमर्स सेवा विस्कळीत होण्याची किंवा काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वर्षाअखेरच्या नियोजनात याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.