मुंबई : कर्नाटक सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर, महाराष्ट्रातील महिला शिक्षक संघटनांनीही यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पत्र पाठवून, मासिक पाळीच्या काळात होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन महिलांना रजा देण्याची मागणी केली आहे. संघटनेने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्यात महिलांच्या आरोग्यावर संवेदनशीलता दाखवली नाही, ही बाब महिलांचा अपमान ठरते. कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, जे व्यापक धोरणातून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजेचा अधिकार देत आहे. महाराष्ट्रात अद्याप या विषयावर ठोस पाऊल उचललेले नाही, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.