राज चिंचणकर, राजरंग
ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांनी त्यांच्या नाटकांतून भूमिकाही रंगवल्या आणि रसिकांनी त्यांना उदंड प्रतिसादही दिला. त्यांच्या अशाच काही नाटकांपैकी एक सदाबहार नाटक म्हणजे 'तरुण तुर्क म्हातारे अर्क'...! सन १९७२ मध्ये रंगभूमीवर पहिल्यांदा आलेल्या या नाटकात त्यांनी प्रोफेसर बारटक्के ही भूमिका अशा काही नजाकतीने उभी केली की नाट्यरसिकांच्या तीन पिढ्या त्यांचा हा प्रोफेसर बारटक्के विसरू शकलेला नाही. या नाटकाच्या लेखनाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात त्यांनी वापरलेली 'ह' या अक्षराची बाराखडी...! या बाराखडीवरून निर्माण होणारा हंशा आणि टाळ्यांचा वर्षाव या नाटकासाठी फायदेशीर ठरला. प्रा. मधुकर तोरडमल यांनी ही भूमिका प्रचंड गाजवली आणि रसिकांनीही त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. हेच नाटक आता पुन्हा एकदा नव्या रंगात आणि नव्या ढंगात रंगभूमीवर येत आहे.
आता नव्याने या नाटकाचा पडदा वर जात असताना, प्रा. मधुकर तोरडमल यांनी या नाटकात रंगवलेल्या प्रोफेसर बारटक्के या भूमिकेचे आव्हान कोणता रंगकर्मी स्वीकारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरते. तर नव्या संचात येत असलेल्या या नाटकात ही भूमिका करण्याचे भाग्य अभिनेता अतुल तोडणकर याला लाभले आहे. आता अतुल तोडणकर प्रमुख भूमिकेत असल्याने, थेट तोरडमल ते तोडणकर असा यातल्या प्रोफेसर बारटक्के या भूमिकेचा प्रवास होत आहे. अतुल तोडणकर याच्यासह अभिजीत चव्हाण व नीता पेंडसे यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका असून चिंतन लांबे, सोहन नांदुर्डीकर, स्वानंद देसाई, नीलेश देशपांडे, श्रुती पाटील हे कलाकारही यात भूमिका साकारत आहेत. एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडल्यानंतर अतुल तोडणकर या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या नाटकाच्या मागे चक्क पाच महिला निर्मात्या ठामपणे उभ्या आहेत. प्रियांका पेडणेकर, मधुरा पेडणेकर, योगिता गोवेकर, प्राची पारकर व विजया राणे यांनी या नाटकाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
प्रा. मधुकर तोरडमल लिखित या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. 'अनामिका' व 'कौटुंबिक कट्टा' निर्मित आणि 'साईसाक्षी' प्रकाशित या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे, पार्श्वसंगीत तुषार देवल आणि प्रकाशयोजना श्याम चव्हाण यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. या नाटकाचे सूत्रधार अशोक मुळ्ये व दिनू पेडणेकर आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. त्यानंतर ३१ डिसेंबरला रात्री काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे आणि १ जानेवारीला दुपारी श्री शिवाजी मंदिर, दादर येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.
या नाटकात प्रोफेसर बारटक्के ही मध्यवर्ती भूमिका रंगवणारा अतुल तोडणकर याविषयी बोलताना म्हणतो, "हे नाटक लेखनातच उत्तम जमून आले आहे. हे नाटक कालातीत आहे. दुसरे म्हणजे त्याला 'टाईम बाउंड्रीज' नाहीत. त्या काळात ते झाले होते; आता तसे चालणार नाही वगैरे काही मुद्दाच इथे निर्माण होत नाही. मामांनी (मधुकर तोरडमल) यांनी ती भूमिकाच खूप सुंदर केली होती. आता बऱ्याच गोष्टी त्यांच्यासारख्या न करता आपल्याला काही वेगळे करता येईल का, याकडे मी लक्ष देत आहे. पण हे करताना, मामांनी केलेल्या त्या व्यक्तिरेखेला कुठेही धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने मी ही भूमिका करण्याचा प्रयत्न करत आहे. ही भूमिका नव्याने करण्यातही मजा आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यातही मजा आहे. ही भूमिका साकारताना धडधड होत होती; पण आम्ही जसजशा रिहर्सल्स करत आहोत, तसतशी ही धडधड कमी होत आहे. अशा पद्धतीची भूमिका करताना तुलना होणारच; पण मला तुलना होण्याची भीती वाटत नाही. मामांनी जे करून ठेवले आहे; ते तर अजरामरच आहे. मी मुळात हे नाटक का करत आहे; तर मी अशा एका नाटकाच्या शोधात होतो, ज्याने मला छान रिस्टार्ट करता येईल. दुसरे म्हणजे, या नाटकाचा जो स्पीड आहे, तो मला रिस्टार्ट करताना हवा होता. तो इथे उत्तम जुळून आला आहे. मी एक गोष्ट पहिल्यापासून करतोय आणि ती म्हणजे मी कमरेखालचे विनोद कधीच केले नाहीत; परंतु या नाटकात या संदर्भाने पुसटशी अशी सीमारेषा आहे; मात्र ती रेषा मी कधीच पार करणार नाही. भूमिकेची तुलना होणार, ही भीती म्हणून न घेता चॅलेंज म्हणून मी स्वीकारले आहे".
नव्या संचात रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्याशी याबाबत संवाद साधला असता ते सांगतात, "सन १९७२ मध्ये हे नाटक आले होते. हे नाटक लोकांना इतके माहीत आहे आणि गाजलेले आहे की अगदी आत्तापर्यंत त्याचे प्रयोग होत होते. युट्यूबवरही ते उपलब्ध आहे. प्रा. मधुकर तोरडमल यांची एक विशेष इमेज या नाटकामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांना हे नाटक माहीत आहे. आता हे नाटक करताना मला सध्याच्या पिढीची ऊर्जा देणे गरजेचे होते. मला पूर्वीपेक्षाही अधिक एनर्जेटिक प्रयोग करणे गरजेचे होते. आता प्रत्येक दिग्दर्शक जेव्हा नाटक बसवतो, तेव्हा त्यात नवनवीन काहीतरी करत असतो. मूळ नाटकात १९७० चा जो काळ आहे, तो मात्र आम्ही १९८०-८५ इतका पुढे आणला आहे. बाकी गोष्ट तीच आहे आणि संदर्भही तेच आहेत. मुळात ते नाटक किंवा वाक्याला त्यात जे विनोद आहेत आणि ते इतके सुंदर लिहिले गेलेले आहेत की संहिता म्हणून त्यात काही बदल करण्याची आवश्यकताच नाही. अभिजीत चव्हाण, अतुल तोडणकर व नीता पेंडसे यांच्यासह आमच्या नाटकातले नवीन कलाकार खूप मेहनती आहेत. अभिजीत व अतुलसोबत मी खूप काम केले आहे. त्यामुळे ते काय करू शकतात, याची मला कल्पना आहे. अतुलबाबत सांगायचे तर त्याची ही तशी पहिलीच भूमिका आहे की जिथे तो मुख्य भूमिकेत आहे. आजारपणानंतर तो नाटकात पुन्हा येत आहे आणि त्याचे पुनरागमन अशा एका नाटकातून होत आहे की जे रंगभूमीवर इतके गाजलेले आहे".