भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती
नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून, हीचे मुले भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'वीर बाल दिवसा'निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात भाषण केले. वीर बाल दिवस हा गुरू गोविंद सिंग यांच्या साहिबजादे-जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण त्या शूर साहिबजादांचे स्मरण करत आहोत, जे आपल्या भारताचा अभिमान आहेत. ते भारताच्या धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहेत. वय आणि परिस्थितीच्या सीमा तोडणारे हे शूरवीर आहेत. ज्या राष्ट्राचा इतका गौरवशाली भूतकाळ आहे, ज्यांच्या तरुण पिढीला अशी प्रेरणा वारशाने मिळाली आहे.
"माझ्या देशाची तरुण पिढी आज या कार्यक्रमात आहे. एका अर्थाने, तुम्ही सर्व 'जेन-झी' आहात. काही 'जेन-अल्फा' देखील आहात. तुमची पिढी भारताला विकसित भारताच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. मला प्रामाणिकपणे वाटते की, केवळ वयाने कोणीही लहान किंवा मोठा होत नाही. प्रत्येकाचे कर्तृत्व त्याला लहान-मोठा बनवत असते. तुम्ही तुमच्या कामातून आणि कामगिरीतून महान बनता. अगदी लहान वयातही तुम्ही अशी कामे करू शकता की इतर लोक तुमच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात. तुम्ही भारताचे भविष्य आहात," असा मोलाचा संदेश मोदी यांनी युवांना दिला.
पंतप्रधानांनी संस्कृतमधील एका श्लोकाचा उल्लेख करत सांगितले की, एखादे लहान मूल जर ज्ञानाची गोष्ट सांगत असेल, तर ती स्वीकारली पाहिजे. त्यांनी तरुण वयात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “तुम्ही कमी वयात मोठी कामे करू शकता, आणि तुम्ही ते करून दाखवले आहे. मात्र, या यशाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तुमची स्वप्ने आकाशापर्यंत न्या. देश ठाम निर्धाराने तुमच्या पाठीशी उभा आहे,” असे त्यांनी सांगितले.
भूतकाळातील निराशेची आजच्या संधींशी तुलना करताना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी तरुण स्वप्ने पाहण्यास घाबरत होते, कारण जुन्या व्यवस्थेमुळे निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता देश प्रतिभेचा शोध घेत आहे आणि १४० कोटी नागरिकांच्या ताकदीवर आधारित भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्यांनी इंटरनेट, स्टार्टअप मिशन आणि लक्षीत विकासासाठी उभारलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सचा उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी)वर विशेष भर दिला. हे धोरण पाठांतराऐवजी व्यावहारिक शिक्षण, चिकित्सक विचारसरणी आणि प्रश्न विचारण्याला प्राधान्य देते, असे त्यांनी सांगितले. पहिल्यांदाच सरकार नव्या शिकण्याच्या आणि विचार करण्याच्या प्रक्रियेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नवकल्पना आणि डिझाइन थिंकिंगला चालना देण्यासाठी अटल टिंकरिंग लॅब्सच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले.