हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध
मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती येणार आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन आर्थिक अडचणींमुळे रखडले होते, मात्र आता भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने भूसंपादनासाठीच्या २२ हजार ५०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी हमी दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) हुडकोकडून २२ हजार ५०० कोटी रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. आर्थिक अडचण दूर झाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या कामास सुरुवात केली जाणार असून तीन महिन्यात ७० टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे.
विरार ते अलिबाग प्रवास अतिजलद करण्यासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका बांधण्यात येणार आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. आर्थिक कारणांमुळेच या प्रकल्पाचे भूसंपादन रखडले होते.
आता मात्र नवीन वर्षात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने १२९ किमीच्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेतील नवघर ते बलवली अशा ९८ किमीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी बांधा-वापरा-हस्तांतरीत करा तत्वानुसार निविदा काढण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.
या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता या प्रकल्पातील भूसंपादनाचा मार्गही मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने हमी दिल्यानंतर आता हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज मिळाले आहे. कर्ज मिळाल्याने आता महिन्याभरात भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरुवात केली जाणार आहे.