जिल्ह्यात भाजपचे ९४ पैकी ५० नगरसेवक
गणेश पाटील पालघर: पालघर जिल्ह्यात तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर पालघर शहरावर शिवसेनेचे असलेले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. वाडा आणि जव्हार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने इतिहास नोंदविला. डहाणूमध्ये भारतीय जनता पक्षाने २७ पैकी १७ जागा जिंकल्या, मात्र नगराध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागल्याने येथील निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत आहे. अशा अनेक बाबी या निकालानंतर समोर आल्या आणि आणखी काही विषय समोर येणे आवश्यक आहेत.
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीची. शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी (शरद पवार ) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीत असलेल्या राजकीय पक्षाच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा भाजपबाबत द्वेष नाही, मात्र भाजपने नगराध्यक्ष पदासाठी दिलेला उमेदवार नको आहे. अशी आगळीवेगळी भूमिका या निवडणुकीत घेतली. त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा साथ दिली. दोन्ही शिवसेनेमध्ये विस्तव जात नसताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) मधील नेते शिंदेंच्या शिवसेनेसोबत कोणत्याही विषयावर एकमत करायला तयार नसताना डहाणू येथे मात्र भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या राजू माच्छी यांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोट बांधली. "भाजप चालेल पण भरत नको" असाच प्रचार सुद्धा या निवडणुकीत मतदारांसमोर करण्यात आला. या निवडणुकीच्या निकालात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भरत राजपूत यांचा ४ हजार ५५ मतांनी पराभव झाला. त्यांना एकूण १० हजार ७६० मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे राजू माच्छी यांना एकूण १४,८१५ मते मिळाली. या ठिकाणी २७ पैकी १७ नगरसेवक भाजपचे निवडून आले.
भाजपच्या निवडून आलेल्या १७ उमेदवारांच्या मतदानाची बेरीज केली असता, १७ हजार ९९७ एवढी आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजप नगरसेवकांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत भरत राजपूत यांना ७ हजार ३७ मते कमी मिळाली आहेत. यावरून "क्रॉस वोटिंग" झाले हे स्पष्ट होत आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये मोठी मजल मारत नगराध्यक्षसह ११ नगरसेवक निवडून आले आहेत. जव्हार नगर परिषदेमध्ये दोन अंकी आकडा कधीही न गाठणाऱ्या भाजपने यावेळी २० पैकी १४ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद आपल्या पारड्यात पाडून घेतले आहे. पालघर नगर परिषदेमध्ये सुद्धा जागांचे "प्रमोशन" झाले आहे. यावेळी ८ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. त्यामुळे नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. या निकालामुळे साहजिकच खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, निवडणूक प्रमुख बाबजी काठोके यांच्यासह जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनाच या यशाचे श्रेय जाते. रजपूत हे डहाणूमध्ये पराभूत झाल्यामुळे या एकाच विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मात्र डहाणूतील १७ नगरसेवकांचे यश, यासह जिल्ह्यातील ९४ पैकी तब्बल ५० नगरसेवक निवडून आणणारे जिल्हाध्यक्ष म्हणून नक्कीच त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. परिणामी माजी नगराध्यक्ष डहाणूची निवडणूक हरले असले तरी जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायतीची निवडणूक जिल्हाध्यक्ष म्हणून राजपूत हे जिंकलेच आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये.