टीझरमधून समोर येणारी कथा ही एका डॅशिंग, रुबाबदार नायकाची आणि त्याच्या ड्रीम गर्लची आहे. मात्र ही केवळ गोडगुलाबी प्रेमकहाणी नसून, एक रुबाबदार प्रेमकहाणी आहे. प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेला, स्वतःचे नियम स्वतः ठरवणाऱ्या या नायकाची प्रेमकहाणी सगळ्यांनाच जबरदस्त आवडेल हे नक्की. दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे म्हणतात, “ ‘रुबाब’ हा चित्रपट स्वतःचा ठाम आवाज असलेल्या तरुणाईची कथा आहे. आजच्या पिढीचे प्रेम प्रामाणिक असते मात्र त्यात एक स्वॅग असतो. तोच रुबाब आम्ही या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.” झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केले असून संजय झणकर आणि गौरी झणकर निर्माते आहेत तर उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात संभाजी ससाणे व शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ६ फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.