मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा विकण्याचे ठरवले आहे. मुख्य प्रवाहातील नसलेल्या भांडवली गुंतवणूकीला काढून टाकून मुख्य प्रवाहात ती गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नव्या माहितीनुसार, संपूर्ण १००% आपला हिस्सा कंपनी श्रीराम लाईफ इन्शुरन्समधील काढून घेणार आहे. नव्या बदलानुसार आता ही गुंतवणूक ६०० कोटींच्या घरात सांगितली जाते. तो हिस्सा कंपनी सनलाम इमर्जिंग मार्केट कंपनीला विकणार आहे. ४००० कोटी मूल्यांकन असलेल्या कंपनीतील ६०० कोटींचा हिस्सा या सनलाम या मॉरिशस स्थित कंपनीला विकेल.
यासह पिरॅमलने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी विक्रीसाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी देखील केली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) मंजुरीसह नियामक मंजुरींच्या अधीन राहून हा व्यवहार ३१ मार्च, २०२६ रोजी संपणाऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असे कंपनीने म्हटले.
सॅनलाम इमर्जिंग मार्केट्स (मॉरिशस) ही सॅनलाम इमर्जिंग मार्केट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी (Subsidiary) आहे आणि सॅनलाम समूहाचा एक भाग आहे. या विक्रीमुळे चेन्नईस्थित श्रीराम समूहाच्या दोन विमा संयुक्त कंपनीपैकी एक असलेल्या श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीमधील सॅनलामची मालकी आणखी वाढणार आहे. श्रीराम कॅपिटलकडे श्रीराम लाइफ इन्शुरन्समध्ये ४७% हिस्सा आहे, तर सॅनलामकडे २३% हिस्सा आहे.
३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षात, श्रीराम लाइफने लाभांश (Dividend) उत्पन्नाद्वारे पिरॅमल फायनान्सच्या महसुलात १२.६८ कोटी रुपयांचे योगदान दिले होते जे एकूण महसुलाच्या ०.१२% होते. पिरॅमल फायनान्सने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, ही विक्री अवशिष्ट गैर-मुख्य मालमत्तांचे (Non Core Investment) म्हणून मुद्रीकरण (Monetised) करण्याच्या त्यांच्या धोरणाशी सुसंगत असून मिळणारा निधी आर्थिक ताळेबंद मजबूत करण्यासाठी वापरला जाईल.' असे म्हटले
सॅनलाम श्रीरामच्या विमा व्यवसायातील आपला सहभाग सातत्याने वाढवत आहे. गेल्या वर्षी त्यांनी टीपीजी इंडिया इन्व्हेस्टमेंट्स II आणि श्रीराम ओनरशिप ट्रस्टकडून श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी या दोन्ही कंपन्यांमधील अतिरिक्त हिस्सेदारी विकत घेतली होती.
यासह पिरॅमल एंटरप्रायझेसने २०१२-१३ मध्ये आपला औषध व्यवसाय विकल्यानंतर श्रीराम समूहात गुंतवणूक केली तसेच तीन श्रीराम कंपन्यांमध्ये ४५८३ कोटी रुपये गुंतवले. २०१९ मध्ये, त्यांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीमधील आपला हिस्सा सुमारे २३०० कोटी रुपयांना विकला. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, स्कीम ऑफ अरेंजमेंट अंतर्गत समूहातील एकत्रीकरणाचा (Consolidation भाग म्हणून श्रीराम सिटी युनियन फायनान्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स आणि श्रीराम कॅपिटल यांचे विलीनीकरण करण्यात आले होते.