कार्यकर्ता मेळाव्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला विश्वास, विविध राजकीय पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
मुंबई: महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत १२० जागा भाजपने जिंकल्या. विरोधक नावालाही शिल्लक नाही. उबाठा सेनेच्या केवळ ९ जागा आल्या. जनतेचा भाजपावर विश्वास आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत १५० पेक्षा जास्त जागा महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ तर्फे आज बोरिवली येथील पाटीदार समाज हॉल येथे कार्यकर्ता मेळावा व जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे यांच्या हस्ते समीर सरोज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.
याप्रसंगी मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, सुभाष येरुणकर, मोतीभाई देसाई, शिवाजी चौगुले, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, महामंत्री संजय घाडी, महिला मोर्चा अध्यक्षा प्रियांका रेडकर, वॉर्डअध्यक्षा मृदुला पवार, वॉर्ड अध्यक्ष तेजस माने, कृष्णा दरेकर, रश्मी भोसले, अशोक कांबळे, कमला राजपुरोहित, ललित शुक्ला, सुरज नवाडकर, आदित्य दरेकर यांसह मोठ्या संख्येने प्रभाग क्रमांक ५ मधील पुरुष आणि महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, भाजपचे उत्तम संघटन असणारा प्रभाग क्रमांक ५ वॉर्ड आहे. भाजपा हा विकासाचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे नेण्याचे काम होतेय. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचे राजकारण आम्ही करतोय. जातीपातीवर राजकारण होत असताना विकासवरही राजकारण होते हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला दाखवून दिलेय. त्यामुळे मुंबई आज वेगाने बदलताना दिसतेय. मुंबईला आकार महायुती देऊ शकते, विकासासाठी भाजपासारखा दुसरा पक्ष नाही म्हणून आज समीर सरोज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवकांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्याचेही दरेकरांनी म्हटले.
दरेकर पुढे म्हणाले की, भाजपा शिस्तीचा पक्ष आहे. ज्याला राजकारण पोटात ठेवता येते तो यशस्वी होतो. जगवाटपाची चर्चा सुरु आहे. मागाठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. युती आघाड्या होत असतात. जास्तीत जास्त जागा मागाठाणेत भाजपाला कशा मिळतील हा प्रामाणिक प्रयत्न करणार असून पक्ष वाढ आणि कमळ फुलविण्यासाठी प्रयत्न करणे ही कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी असल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, विकासकामांची चिंता करू नका. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही सरकार भाजपा महायुतीचेच असणार. महायुती म्हणून मागाठाणेतील सातच्या सात जागा कमळ व धनुष्यबाणाच्या निवडून आणणार आहोत. प्रभाग क्रमांक ५ मधील बूथ अध्यक्ष, कमिटी मेम्बर, बूथ सदस्य यांनी सज्ज राहायला हवे. नियोजन पद्धतीने काम करा. संघटन भक्कम करा, हे संघटन नक्कीच यश मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ विश्वासही दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.