उबाठा गटाचा उडवला धुव्वा
वाडा : वाडा नगरपंचायतीच्या रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने नगराध्यक्ष पदासह १२ जागांवर विजय मिळवत वाडा नगरपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापन करून आपला झेंडा फडकवला आहे. रिमा गंधे यांनी ३ हजार ९६७ मते मिळवून सुमारे ९७२ मतांनी विजयी झाल्या आहेत. शिवसेना पक्षाने तीन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक, काँग्रेस एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अशा जागांवर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाचा धुव्वा उडवला असून राष्ट्रवादी पक्षाला आपले खातेही खोलता आले नाही. त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
रिमा गंधे यांना ३ हजार ९६७ मते मिळाली असून त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाच्या उमेदवार हेमांगी पाटील यांना २ हजार ९९५, तर उबाठा गटाच्या निकिता गंधे यांना २ हजार ४८७ मते मिळवून रिमा गंधे या ९७२ मतांनी विजयी झाल्या. रिमा यांचा विजय होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपच्या स्मिता पातकर यांनी ४०७ मते मिळवून उबाठा गटाच्या प्रिती गंधे यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक ४ भाजपचे अशिकेश पवार हे विजयी झाले असून त्यांना २७९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेश पालकर पराभूत झाले. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे तेजस पाटील ३६५ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेना पक्षाचे राजकिरण पाटील यांचा पराभव केला आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपच्या सिद्धी भोपतराव या विजयी झाल्या असून त्यांना २२४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रिया गंधे यांचा एका मताने पराभव झाला. प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपच्या मयुरी म्हात्रे या विजयी झाल्या असून त्यांना १५६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार रिद्धी भोईर यांचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक ही अंत्यत चुरशीची व रंगतदार झाली होती. या निवडणुकीत भाजपचे मनिष देहेरकर हे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी संदीप गणोरे यांचा ९ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १२ मधून कॉग्रेसच्या भारती सपाटे यांनी देखील सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक १४ मधून भाजपच्या रिता थोरात विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेना गटाच्या रेश्मा गायकवाड यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपच्या प्रगती वलटे विजयी झाल्या असून त्यांना १६५ मते मिळाली. या प्रभागातून माजी सभापती विशाखा पाटील पराभूत झाल्या.
प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेना पक्षाचे अजिंक्य पाटील हे विजयी झाले असून त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार प्रथमेश गोरे यांचा ५ मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक १७ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुचिता पाटील या देखील दुसऱ्यांदा प्रचंड मतांनी विजयी झाल्या असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार माजी उपनगराध्यक्ष वर्षा गोळे यांचा दारुण पराभव केला.