धाराशिव : राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील परभणी आणि धाराशिव या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मविआचा पूर्णपणे सुपडा साफ झाला असून महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निकालांचे राजकीय पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद जिंकता आलं नाही. काँग्रेसला विजयाच्या जवळ जाऊनही पराभव स्वीकारावा लागला, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं अस्तित्वच दिसून आलं नाही. धाराशिव जिल्ह्यातही याच स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं.
धाराशिवमधील आठ नगरपालिकांच्या निकालात महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष पद मिळालं नाही. सर्व जागांवर महायुतीने आपली ताकद दाखवत वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांत मविआसाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे.
निकाल जाहीर होताच महायुतीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. परभणीतील मेघना बोर्डीकर यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करत ‘मै हूँ डॉन’ या गाण्यावर जल्लोष केला. आमच्या घरात सुरुवातीपासूनच विजय मिळाला की हेच गाणं लावलं जातं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
धाराशिवमध्येही अशाच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला. शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी ‘धाराशिव जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला आहे’ असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा लोकसंपर्क कमी पडल्यामुळेच हा पराभव ओढवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
धाराशिव जिल्हा निकाल
भाजप – ४
धाराशिव – नेहा राहुल काकडे
तुळजापूर – विनोद उर्फ पिंटू गंगणे
नळदुर्ग – बसवराज धरणे
मुरूम – बापूराव पाटील
शिवसेना – ३
उमरगा – किरण गायकवाड
कळंब – सुनंदा शिवाजी कापसे
परंडा – झाकीर सौदागर
स्थानिक आघाडी – १
भूम – संयोगिता संजय गाढवे (शिवसेना तानाजी सावंत समर्थक)
उबाठा – ०
काँग्रेस – ०
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार – ०
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार – ०
परभणी जिल्हा निकाल
भाजप – २
जिंतूर – प्रतापराव देशमुख
सेलू – मिलिंद सावंत
शिवसेना – १
पाथरी – आसेफ खान
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – २
गंगाखेड – उर्मिला केंद्रे
मानवत – राणी अंकुश लाड
काँग्रेस – ०
उबाठा – ०
राष्ट्रवादी (शरद पवार) – ०
अपक्ष – २