आज दुपारपर्यंत चित्र होणार स्पष्ट
सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी
गणेश पाटील
पालघर : मतदारांनी निवडलेले नगरसेवक आणि नगराध्यक्ष कोण आहेत, हे कळण्यासाठी तब्बल १८ दिवसांची प्रतीक्षा सर्वांना करावी लागली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, वाडा आणि जव्हार येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या निवडणुकीचा निकाल (आज) रविवारी जाहीर केला जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाणार असून, दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगर परिषदेसह वाडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. मात्र या निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी मतदार उमेदवार आणि राजकीय पक्षांना चांगलीच प्रतीक्षा करावी लागली आहे. पालघर नगर परिषदेच्या ३० जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली आहे, तर डहाणू २७ जागा, जव्हार २० आणि वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह १७ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीमध्ये राज्याच्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन प्रमुख पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. चारही ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये लढत झाली आहे. विशेष म्हणजे डहाणू येथे नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोट बांधली होती. शिवसेना (शिंदे) गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू माच्छी यांना पाठिंबा देत नगरसेवक पदांसाठी या चारही राजकीय पक्षाने आघाडी तयार केली आहे. त्यामुळे डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व अशी लढत झाली आहे. पालघर नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाल्याच्या चर्चा आहेत . भाजपचे कैलाश म्हात्रे आणि शिवसेनेचे उत्तम घरत हे दोघे जुने सहकारी आज नगराध्यक्ष पदासाठी आमनेसामने आले आहेत. वाडा आणि जव्हार या ठिकाणी सुद्धा भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते.
दोन जागांसाठी पार पडली निवडणूक
पालघर नगर परिषदेच्या प्रभाग १ मधील ब जागेसाठी आणि वाडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १२ मधील एका जागेसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. पालघर नगर परिषदेच्या प्रभाग १ 'ब' जागेकरिता असलेल्या एकूण २,८५० मतदारांपैकी २,०१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी मतदानाची टक्केवारी ७०.७४ टक्के एवढी झाली आहे. तर वाडा नगरपंचायतीच्या प्रभाग १२ साठी एकूण असलेल्या ६०६ मतदारांपैकी ४७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, पालघर प्रभाग १ 'ब' (सर्वसाधारण) जागेकरिता आरिफ उस्मान कलाडिया (उबाठा), राज रमेश धोत्रे (भाजप), रवींद्र मधुकर म्हात्रे शिवसेना (शिंदे गट), अफसर अजीज शेख (अजित पवार गट) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर वाडा प्रभाग १२ मधील (सर्वसाधारण) जागेकरिता प्रफुल पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार गट), भारती सपाटे (काँग्रेस), प्रमोद पठारे (भाजप) या उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. या निवडणुकीचा निकाल सुद्धा रविवारी जाहीर केला जाणार आहे.