रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार नगर परिषद व लांजा, देवरूख व गुहागर या तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचे निकाल रविवारी जाहिर झाले. जिल्ह्यात निवडणूक झालेल्या या एकूण सात ठिकाणांपैकी सहा ठिकाणी भाजपा, शिवसेना महायुतीने लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर विजय मिळवत निवडणूकीत बाजी मारली आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड या तीन नगर परिषद व लांजा नगर पंचायतीवर शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले असून गुहागर व देवरूख नगर पंचायतींवर भाजपाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. मात्र राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सात पैकी सहा ठिकाणी महायुतीने बाजी मारल्याने महायुतीचाच बोलबाला असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या निवडणूकीतील विजयाचे पडसाद हे आगामी काळात होणाऱ्या जि. प. व पंचायत समित्यांच्या निवडणूकीत नक्कीच उमटणार आहेत.
रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार नगर परिषद व लांजा, देवरूख व गुहागर या तीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. प्रदिर्घ अशा प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकांकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याने या निवडणुकीत महायुती आपला हा बालेकिल्ला अबाधित राखणार का याबाबत उत्सुकता होती. राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांसह राजापूरचे आमदार किरण सामंत, चिपळूणचे आमदार शेखर निकम व उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांच्या मतदार संघात या निवडणुका होत असल्याने अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला. मात्र निकालांती जिल्ह्यात महाविकास आघाडीचे फारसे कुठे अस्तीत्वच राहिले नसल्याचे पुढे आले आहे.
रविवारी आलेल्या निकालात हा सामना महायुतीने जिंकल्याचे स्पष्ट झाले. सात पैकी रत्नागिरी, चिपळूण, खेड या तीन नगर परिषदांवर महायुतीचे नगराध्यक्ष विजयी होऊन तेथे महायुतीची पुर्ण बहुमताने सत्ता आली आहे. तर लांजा, देवरूख व गुहागर या तीनही नगर पंचायतीही महायुतीने जिंकल्या आहेत. जिल्हयातील एकमेव राजापूर नगर परिषदेवर महायुतीला सत्ता मिळविता आली नाही, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी महायुतीच्या श्रृती ताम्हनकर यांचा पराभव केला. या ठिकाणी २० पैकी दहा नगरसेवक महाविकास आघाडीचे तर दहा महायुतीचे निवडून आले आहेत.
रत्नागिरीत महायुतीच्या शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. तर ३२ पैकी, शिवसेना २३, भाजप ६, उबाठा ३ जागी विजयी झाले आहेत. खेडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या माधवी बुटाला विजयी झाल्या. नगरसेवकांच्या २०जागापैकी १७ शिवसेना ३ भाजपने विजय मिळविला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. चिपळूण नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झाले असुन नगरसेवक पदाच्या २८ जागांमध्ये शिवसेन ९, भाजप ८, उबाठा ५, काँग्रेस आय ३, राष्ट्रवादी अजित पवार २, राष्ट्रवादी शरद पवार १ विजयी झाले आहेत. राजापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या ॲड. हुस्नबानू खलिफे नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून नगरसेवक पदाच्या २० जागांमध्ये काँग्रेस ७, उबाठा ३, शिवसेना ९ तर भाजपला १ जागा मिळाली आहे.
लांजा नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सावली कुरुप विजयी झाल्या असून नगरसेवक १७ जागांमध्ये शिवसेना १०, भाजप १, अपक्ष ५, उबाठा १ जागा आहे. गुहागर नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी भाजपाच्या निता मालप विजयी झाल्या असून नगरसेवकपदाच्या १७ जागांवर शिवसेना ८, भाजप ५, राष्ट्रवादी अजित पवार गट १, उबाठा २ व मनसे १ असे बलाबल आहे. तर देवरुख नगरपंचायतीत नगराध्यक्षपदी भाजपाच्या मृणाल शेट्ये विजयी झाल्या असून नगरसेवक पदाच्या १७ जागांमध्ये भाजप ३, शिवसेना ३, अजित पवार राष्ट्रवादी ४, अपक्ष ४, उबाठा ३ असे पक्षीय बलाबल राहणार आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा महायुतीने वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीतही दिशाहिन झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणुकीत महायुतीला या विजयाचा लाभ नक्कीच होणार यात शंका नाही.