नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार आता हिंदी भाषेच्या प्रचारासाठीही काम करणार आहेत. कंगना यांना सांस्कृतिक मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कंगना राणौतसह सहा खासदारांना मंत्रालयाच्या हिंदी सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, तर मंत्रालयातील राज्यमंत्री राव इंद्रजीत सिंह हे समितीचे पदसिद्ध उपाध्यक्ष असतील.
कंगना राणौत व्यतिरिक्त,समितीचे सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या पाच खासदारांमध्ये अरुणाचल प्रदेशातील भाजपचे राज्यसभा खासदार,मध्य प्रदेशातील भाजपचे लोकसभा खासदार रोडमल नागर आणि हरियाणातील भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांचा समावेश आहे.भारत सरकारच्या प्रत्येक मंत्रालयात एक हिंदी सल्लागार समिती स्थापन केली जाते.समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो.हिंदी सल्लागार समितीचे मुख्य कार्य मंत्रालयात हिंदीच्या प्रचार आणि विकासासाठी धोरणे तयार करणे आहे.समितीची बैठक झाल्यावर तिच्या सदस्यांना प्रवास खर्च आणि मानधन दिले जाते.