मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून स्थानिक राजकीय समीकरणं लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेतल्याने मुंबईतील राजकीय गणितं बदलल्याची चर्चा आहे. मनसेसोबतच्या युतीमुळे ठाकरे गटाची ताकद वाढताना दिसत असली, तरी निवडणूक जवळ येत असताना पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे. तर शरद पवार हे ठाकरे गट आणि मनसेसोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिन्ही पक्ष एकत्र आले, तरी ठाकरे गटातील काही नेत्यांना अल्पसंख्यांक मतदार नाराज होण्याची भीती सतावत आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे ठाम असले, तरी काँग्रेसला बाजूला ठेवायचं की नाही, यावरून पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे.
मुंबईत काँग्रेसची पारंपरिक ताकद लक्षात घेता हा निर्णय ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक मतांच्या पाठिंब्यावर ठाकरे गटाला मोठा फायदा झाला होता. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन जागा जिंकण्यात आल्या होत्या, तर वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी हातातून गेली होती. अशा परिस्थितीत काँग्रेसपासून फारकत घेतल्यास अल्पसंख्यांक मतांमध्ये घट होण्याची शक्यता असून मतविभागणीचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेससोबतच राहावं, अशी भूमिका ठाकरे गटातील काही नेते अजूनही घेत असल्याचं समोर येत आहे.