भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या फलंदाजीने मैदानात वादळ निर्माण केले. मिळालेल्या संधीचे सोने करत संजूने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या १,००० धावांचा टप्पाही दिमाखात पूर्ण केला. विशेष म्हणजे, सर्वात जलद १,००० धावा करण्याच्या बाबतीत त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
सर्वात वेगवान १००० धावा: संजूने मोडले राहुल आणि तिलकाचे रेकॉर्ड
टी-२० कारकिर्दीत १००० धावा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या चेंडूंच्या संख्येनुसार, संजू सॅमसनने आता हार्दिक पांड्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. संजूने ही कामगिरी करण्यासाठी फक्त ६७९ चेंडू घेतले. यादरम्यान त्याने केएल राहुल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंना पिछाडीवर टाकले आहे.
अहमदाबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ...
भारताच्या सर्वात कमी चेंडूत १००० टी-२० धावा
- ५२८ – अभिषेक शर्मा
- ५७३ – सूर्यकुमार यादव
- ६७९ – हार्दिक पंड्या
- ६७९ – संजू सॅमसन
- ६८६ – केएल राहुल
- ६९० – तिलक वर्मा
संथ सुरुवात पण ऐतिहासिक षटकार!
या सामन्यापूर्वी संजूला १००० धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. डावाची सुरुवात त्याने अत्यंत संयमाने केली आणि तिसऱ्या चेंडूवर खाते उघडले. मात्र, दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्को जॅन्सनला मारलेला खणखणीत षटकार ऐतिहासिक ठरला. याच षटकारासह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. भारतासाठी हा टप्पा गाठणारा तो १४ वा भारतीय फलंदाज आणि तिसरा यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघात तीन मोठे बदल
नाणेफेकीदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने टीम इंडियामध्ये तीन महत्त्वाचे बदल केल्याचे जाहीर केले. शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला सलामीची संधी देण्यात आली. गोलंदाजीमध्ये हर्षित राणाच्या जागी अनुभवी जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले. फिरकीपटू कुलदीप यादवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले. "पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने हा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मालिका जिंकण्यापेक्षा, संघ म्हणून आम्हाला नक्की काय हवे आहे, हे अजमावण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे," असे सूर्यकुमारने यावेळी स्पष्ट केले.
दोन्ही संघातील खेळाडू
भारत : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.