पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे सुरू झालेला वाद आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. सरकारी डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी महिला डॉक्टर आयुष नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर अवघ्या २४ तासांत संबंधित डॉक्टर महिलेने बिहार सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे आपण मानसिक तणावात असल्याचे आयुष नुसरत परवीन यांनी सांगितले. त्यांनी बिहार कायमचे सोडल्याचेही स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
बिहारमध्ये नुकताच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार नियुक्तीपत्र देत असताना आयुष नुसरत परवीन यांचा हिजाब ओढल्याचा प्रकार घडला. आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकारावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. अनेकांनी हा प्रकार असंवेदनशील असल्याचे म्हटले असून, महिला डॉक्टरच्या वैयक्तिक आणि धार्मिक सन्मानाचा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणामुळे बिहारच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर आयुष नुसरत परवीन यांनी बिहार सरकारची नोकरी स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेतला असून, पुढील वाटचाल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.