मुंबई : टीव्ही अभिनेता अनुज सचदेवावर त्याच्याच सोसायटीच्या आवारात पाठीमागून येऊन डोक्यात दंडुका मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दंडुका मारुन संबंधित व्यक्ती घटनास्थळावरुन शिवीगाळ करत पळून गेली. या घटनेत टीव्ही अभिनेता अनुज सचदेवाच्या डोक्याच्या मागील भागात जखम झाली. हल्लेखोराने अनुजच्या पायावर पण दंडुका मारला. यामुळे त्याच्या एका पायाला जखम झाली आहे. जखमी झालेल्या अनुज सचदेवाने तातडीने उपचार घेतल्यामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
मारहाण करणारा प्रदीप सिंग आहे. त्याने कार व्यवस्थित पार्क केली नव्हती. सोसायटीच्या आवारात 'वॉक' करत असताना कार चुकीच्या पद्धतीने पार्क केल्याचे बघून मी मोबाईलमध्ये फोटो काढला आणि सोसायटीच्या ग्रुपमध्ये टाकला. या प्रकाराचा राग आल्यामुळेच प्रदीपने माझे लक्ष नसताना मागून येऊन डोक्याच्या मागील भागावर तसेच पायावर दंडुका मारला. प्रदीपच्या हल्ल्यात डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचे टीव्ही अभिनेता अनुज सचदेवा म्हणाला. ही घटना घडल्यापासून त्याने सोसायटीच्या आवारात एकट्याने वावरणे थांबवले आहे. पुन्हा हल्ला होईल अशी भीती त्याच्या मनात बसली आहे. हल्लेखोराविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी टीव्ही अभिनेता अनुज सचदेवाने केली आहे. एक इन्स्टा पोस्ट करुन त्याने स्वतःची भूमिका जाहीर केली आहे.
टीव्ही अभिनेता अनुज सचदेवा गोरेगाव येथे एका सोसायटीत वास्तव्यास आहे. तो सध्या 'ये रिश्ता क्या कहलता है' या टीव्ही मालिकेत काम करत आहे. पण ताज्या घटनेमुळे तो अभिनयाऐवजी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.