मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२६मध्ये खुला होण्याची शक्यता असतानाच या प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची तयारी सुरू करण्यात आली. या टप्प्यात गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी परिसरातून पश्चिम द्रुतगती मार्गाकडून येणारा रस्ता आणि मुलुंड पूर्वेकडील जंक्शन सुधारणा यांचा समावेश आहे.गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू असून आता पुर्णत्वाकडे जात आहे. पहिल्या टप्प्यात १२.२ किमी लांबीचा प्रकल्प असून अंतिम टप्पा २०२६ पर्यंत नागरिकांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. या रस्त्यामुळे शहरातील पूर्व-पश्चिम प्रवास सोपा होणार. या टप्प्यातील कामासाठी तब्बल १ हजार २३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा जोडरस्ता ठरणार आहे. सध्याच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि अंधेरी-घाटकोपर मार्गावर वाहतूक ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे. यातील चौथा टप्पा हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा मानला जात आहे. कारण याच टप्प्यात गोरेगाव पूर्व, मुलुंड पूर्व आणि ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्ग यांची थेट वाहतूक जोडणी तयार होणार आहे.