नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार
मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी, कोकण रेल्वेवरून अतिरिक्त रेल्वेगाड्या धावतील. या रेल्वेगाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडे आकारणी केली जाईल. कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटक येथे रेल्वेगाड्या धावतील.
कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने मध्य प्रदेशातील डॉ. आंबेडकर नगर ते कर्नाटकातील ठोकूर येथे विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०९३०४ डॉ. आंबेडकर नगर ते ठोकूर विशेष गाडी २१ आणि २८ डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकर नगर येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता ठोकूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०९३०३ ठोकूर ते डॉ. आंबेडकर नगर विशेष गाडी २३ आणि ३० डिसेंबर रोजी ठोकूर येथून पहाटे ४.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.
या रेल्वेगाड्या इंदौर, देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, भटळ, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल स्थानकांवर थांबतील.
कोकण रेल्वे व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने छत्तीसगड येथील बिलासपूर ते गोव्यातील मडगाव येथे विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येईल. गाडी क्रमांक ०८२४१ बिलासपूर ते मडगाव एक्स्प्रेस २० व २७ डिसेंबर, ३ आणि १० जानेवारी रोजी दुपारी २.४५ वाजता बिलासपूरहून सुटेल.
इगतपुरी स्थानकांवर अतिरिक्त थांबा
या रेल्वेगाडीला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबेल. तसेच गाडी क्रमांक ०८२४२ वरील सर्व स्थानकांवर थांबेल आणि इगतपुरी स्थानकावर तिचा अतिरिक्त थांबा असेल. या रेल्वेगाडीला एकूण १८ एलएचबी डबे असतील. या रेल्वेगाडीचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर, प्रवासी आरक्षण प्रणालीवरून सुरू झाले आहे.