७०० कंपन्या फक्त कागदावरच, अब्जावधींची कमाई; ईडीचा दावा
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने टाकलेल्या छाप्यात कफ सिरप रॅकेट आणि अवैध तस्करी प्रकरणी मोठा पर्दाफाश झाला आहे. ४० तासांपेक्षा अधिक तास ईडीने छापा टाकला. यानंतर मिळालेल्या पुराव्यांनुसार २२० संचालकांच्या नावानं ७०० पेक्षा अधिक कंपन्या बनवण्यात आल्या. या कंपन्यांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांची कमाई करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे यातील बहुतांश कंपन्या फक्त कागदावरच आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनाही कंपनीच्या कागदपत्रांची तपासणी करताना आश्चर्याचे धक्के बसले. कंपनीत अनेक कर्मचारीही फक्त कागदावरच होते. ईडीच्या सूत्रांनी दावा केलाय की अजूनही अनेक कंपन्यांबाबत पुरावे गोळा केले जात आहेत. ईडीसमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे लवकरच संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे.
उत्तर प्रदेश, गुजरात आणि झारखंडमधील २५ ठिकाणांवर ईडीने छापा टाकला. यात समोर आलेल्या माहितीमुळे ईडीचे कर्मचारीही चक्रावले आहेत. ईडीने युपीत अशा पद्धतीची फसवणूक पहिल्यांदाच समोर आल्याचं म्हटलंय.फेंसेडिल सिरप बनवणाऱ्या एका कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना याबाबत माहिती होतं पण त्यांनी मौन बाळगलं होतं. एसटीएफच्या एएसपी लाल प्रताप सिंह यांनी सांगितलं की, एका कंपनीतील अनेक अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात येतील.
एसटीएफची चौकशी झाल्यानंतरही शुभम जयस्वाल, माजी खासदाराचे निकटवर्तीय अलोक सिंह, अमित टाटा यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवायला सुरुवात केली. अमित आणि अलोक यांना अटक केल्यानंतरही यांना काही अडचण झाली नाही. कोर्टात हे आरोपी निश्चिंत होते. जेव्हा ईडीने अमित, शुभम, अलोक यांच्या ठिकाणांवर छापे टाकायला सुरुवात केली तेव्हा मात्र घाबरले.
दुबईत या घोटाळ्याचा सूत्रधार शुभम जयस्वाल लपून बसलाय. तर अलोक सिंह, अमित टाटा यांच्याशिवाय शुभमचा वडील भोला प्रसादच्या खात्यावरही व्यवहार दिसून आले आहेत. यातील अनेक व्यवहारांची पूर्ण माहिती मिळालेली नाही. कंपन्यांच्या नावाने उघडलेल्या खात्यांवरही असे व्यवहार आहेत ज्याची पुढची माहिती नाही. आणखी काही खोट्या कंपन्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. जीएसटी विभागाकडून या कंपन्यांबाबत यादी मिळणार आहे. यामुळे तपासाची व्याप्ती वाढणार आहे.