नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे-संभाजीनगरला जोडणाऱ्या रस्त्याचा प्रकल्प १६ हजार ३१८ कोटींचा आहे . यामुळे पुणे संभाजीनगर हे अंतर केवळ दोन तासांत पार होणार .
कसा असेल महामार्ग ?
या प्रकल्पाविषयी माहिती देताना गडकरी यांनी सांगितलं की, आम्ही पुणे ते संभाजीनगर हा नवीन एक्स्प्रेस हायवे बांधत आहोत. याचा एमएयू झाला असून पहिला रस्ता पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर असा असणार आहे. तो रस्ता आधी पूर्णपणे चांगला करणार आहे. यावर काही ठिकाणी पूल बांधले जाणार आहेत. यासाठी दोन हजार कोटी खर्च केले जाणार आहेत.
दुसरा रस्ता शिक्रापूर येथून जाणार आहे. हा रस्ता अहिल्यानगरच्या बाहेरून थेट बीड जिल्ह्यात जाईल आणि तिथून तो संभाजीनगरपर्यंत जोडला जाईल. हा ग्रीन फिल्ड हायवे असणार आहे. या पूर्ण प्रकलापासाठी १६ हजार ३१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या आहेत.
हा रस्ता तयार झाला तर संभाजीनगर ते पुणे अंतर केवळ दोन तासात पार करता येणार आहे. तर संभाजीनगर नागपूर हे अंतर अडीच तासांत पार करता येणार आहे. एकूण काय तर हा एक्स्प्रेस वे पुणे ते नागपूर असा होणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.