सचिन धानजी
मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या मेट्रो सिनेमा भुयारी मार्गातील हवा खेळती राहावी यासाठी आता अत्याधुनिक स्वयंचलित श्वासावरोध बचाव प्रणाली अर्थात ऑटोमेटीक सफोकेशन रिमोअल सिस्टीम बसवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे हवेतील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मेट्रो भुयारी मार्गातून जाताना गुदमरल्यासारखे वाटणार नाही.
मुंबई महापालिकेच्यावतीने मेट्रो सिनेमा समोर रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. मात्र, या भुयारी मार्गात नैसगिक वायूविजनाची सुविधा नसल्याने यातून ये-जा करताना पादचाऱ्यांना गुदमरल्यासारखे वाटते. तसेच भूमिगत मार्ग असल्याने कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे याठिकाणी बुरशी, फंगल, मायक्रोबियल इत्यादींची वाढ होत आहे. हा सब वे जुन्या डिझाईनप्रमाणे बांधल्याने यातून होणारी गर्दी लक्षात काही प्रमाणात गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे आतील बाजूची नागरिकांची रहदारीमुळे पादचाऱ्यांना मळमळ, सिक बिल्डींग सिंड्रोम इत्यादी व्याधी निर्माण होत आहेत. त्यामुळे या सब वेवर गोंधळ निर्माण होण्याचा धोका वाढला असल्याची माहिती पाहणी अहवालातून समोर आली आहे.
मेट्रो सिनेमा भुमिगत बोगदा जुना व भूमिगत असल्याने त्यात बांधकामात्मक कोणतेही मोठे बदल करता येवू शकत नाही. त्यामुळे नैसर्गिक वायू विजनाची प्रणाली बसवण्याचा निर्णय महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाने घेतला आहे. या प्रणालीद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड अर्थात सीओटू, बुरशी, फंगल इत्यादी घटक काढून टाकले जातील.
ही यांत्रिक प्रणाली आवश्यक असल्यास अग्निशमन सेन्सर प्रणालीशीही जोडली जाऊ शकते. असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रणालीद्वारे एका टोकाकडून हवा सोडून दुसऱ्या टोकाकडून बाहेर टाकली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रणालीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी ओमेक्स कंट्रोल सिस्टीमची निवड करण्यात
आली आहे.