Friday, January 16, 2026

समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करून ‘गूगल लोकेशन’ एका महिन्यात उपलब्ध करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करून ‘गूगल लोकेशन’ एका महिन्यात उपलब्ध करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या होणाऱ्या मृत्यूबाबत मांडलेल्या लक्षवेधीमध्ये मेघना बोर्डीकर साकोरे ,राज्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने समृद्धी महामार्गावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली त्यांनतर झालेल्या चर्चेत स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था उघडकीस आल्यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती स्थानावरून शासनास तातडीचे आणि स्पष्ट निर्देश दिले. “सध्याची कार्यरत असणारी स्वच्छतागृहे आणि स्नॅक्स सेंटर आहेत का? असतील तर मग ती गूगलवर टाकली आहेत का? ती टाकली नसतील तर एका महिन्याच्या आत गूगलवर उपलब्ध करून देण्यात यावीत. कारण पाट्या नाहीयेत, कुठे थांबायचे कळत नाही आणि जिथे जावे तिथे स्वच्छतागृह बंद असते. त्यामुळे गूगलवर लोकेशन तातडीने उपलब्ध करण्यात यावे, ” असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

लक्षवेधी प्रश्न मांडताना विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ यांनी समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची अत्यंत बिकट परिस्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. विशेषतः सिन्नरजवळील ‘हिरकणी कक्ष’ म्हणून दाखविण्यात आलेल्या स्वच्छतागृहात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून ते गोडाऊनसारखे वापरले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामार्गावरील अनेक स्वच्छतागृहे बंद, अस्वच्छ किंवा वापरण्यायोग्य नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, डायबिटीक रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना गंभीर गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी विधानपरिषद सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अंतर्गत दिलेली लक्षवेधी सूचना क्र. ४१२ सभागृहात वाचून दाखवली. या लक्षवेधीमध्ये त्यांनी समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांची धक्कादायक आकडेवारी, मूलभूत सुविधांचा अभाव, पर्यटन हंगामात वाढणारी गर्दी आणि महामार्गावरील सुरक्षा व सोयींविषयी उपस्थित झालेले प्रश्न नमूद केले.

या लक्षवेधींना उत्तर देताना शासनाने माहिती दिली की, समृद्धी महामार्गावरील नियोजित २९ सोयी-सुविधांपैकी २२ ठिकाणी इंधन स्थानके, स्नॅक्स सेंटर आणि स्वच्छतागृहांसह सेवा सुरू आहेत. तसेच २१ ठिकाणी एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहे उपलब्ध असून त्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमले आहेत. काही ठिकाणी तात्पुरती हॉटेल व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि उर्वरित सुविधांचे काम जलदगतीने सुरू असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.

मात्र उत्तर समाधानकारक असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे लक्षात घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला ठाम शब्दांत निर्देश देताना नमूद केले की, “सध्या प्रत्यक्षात कार्यरत असणारी स्वच्छतागृहे गूगलवर दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना कुठे थांबायचे ते कळत नाही. एका महिन्यात सर्व लोकेशन्स गूगलवर दर्शविण्यात यावीत. स्वच्छता, सुरक्षा आणि सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात.”

Comments
Add Comment