मुंबई : इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाली. या गोंधळाचा प्रवाशांना फटका बसला. पण फक्त प्रवासीच नाही तर विमानातून फुलांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
लग्नसराईचा हंगाम आणि फुलांना असलेली आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे अनेक फूल उत्पादक शेतकरी विमानांतून फुलांचा मोठ्या शहरांमध्ये पुरवठा करतात. वाजवी दरात फुलांची वाहतूक करणे शक्य असल्यामुळे देशातील अनेक शेतकरी विमानांचा पर्याय वापरत होते. यातही बहुसंख्य शेतकऱ्यांचा कल फुलांच्या वाहतुकीसाठी इंडिगोची विमानं वापरण्याकडे होता. पण इंडिगो विमान कंपनीची शेकडो उड्डाणं रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांचे फुलांच्या वाहतुकीचे नियोजन कोलमडले.
मावळ तालुक्यातून दररोज सुमारे ५० हजार गुलाब फुलांची विमानाने निर्यात केली जाते. सामान्यतः एका गुलाबाचा भाव सरासरी २० रुपये असतो, पण या फुलांची किंमत दररोज दहा लाख रुपये होते. गुलाबांची निर्यात हा मावळमधील शेतकऱ्यांसाठी मोठा व्यवसाय आहे. मात्र, इंडिगोच्या विमानसेवेतील गोंधळामुळे देशांतर्गत आणि परदेशात निर्यात होणाऱ्या गुलाब फुलांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. ही परिस्थिती फक्त मावळचीच नाही राज्यातील अनेक फुल उत्पादकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. या तोट्याची भरपाई कोण करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.






