आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे
नागपूर: वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागाच्या विकासाची गती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राणे यांनी या प्रकल्पाला 'महाराष्ट्रासाठी घेतलेला गेम चेंजर निर्णय' असे संबोधले.
मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून, तो कोकणच्या विकासाची दारं उघडणार आहे. या निर्णयामुळे कोकणचा आणि महाराष्ट्राचा वेगवान विकास साधता येणार आहे."
कोकणातील अर्थव्यवस्थेला मिळणार बळ
राणे यांनी यावेळी या प्रकल्पाचे कोकणातील अर्थव्यवस्थेवर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले. ते म्हणाले, "या रेल्वे मार्गामुळे आंबा व्यवसाय, काजू व्यवसाय आणि मत्स्य व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. दळणवळण सोपे आणि स्वस्त झाल्याने कोकणातील उत्पादने थेट मोठी बाजारपेठ गाठू शकतील."
सिंधुदुर्गच्या तरुणांसाठी विशेष संधी
या प्रकल्पामुळे कोकणातील तसेच नाशिकमधील युवकांसाठी रोजगाराच्या विशेष संधी निर्माण होतील, असेही नितेश राणे यांनी नमूद केले. ते म्हणाले, "आता गावातच राहून रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण कुठल्याही आव्हानाला सामोरे जाऊन या विकासात पुढे जाईल, यात शंका नाही."
उद्धव ठाकरे यांना आज माझ्याकडून सुट्टी
नितेश राणे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना उपरोधिकपणे उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, "कोकणच्या विकासाचा हा निर्णय पाहता, मी माझ्याकडून आज उद्धव ठाकरे यांना सुट्टी देतो!" वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाल्याने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात आनंद व्यक्त होत असून, या निर्णयामुळे अनेक दशकांची मागणी पूर्ण झाली आहे.