नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा अशी मागणी शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.
बिबट्यांचे राज्यातल्या नागरी वस्तीवरचे हल्ले वाढत आहेत. मागील तीन महिन्यांत बिबट्यांमुळे ५० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. बिबट्या हा मांजर प्रकारातील (मार्जार वर्गातील) वन्य प्राणी आहे. याआधी २०१४ - १५ मध्ये बिबट्याचा धोका सांगितला होता. पण त्यावेळी या धोक्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता संकटाची तीव्रता वाढली आहे. बिबटे वेळीअवेळी कुठेही हल्ले करत आहेत. यामुळे मुलांनी शाळेत जाणे थांबवले. शेतावर किंवा अन्यत्र कामासाठी जाणाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. एरवी सकाळी घराबाहेर पडणारे सकाळी १० किंवा ११ वाजता घराबाहेर पडून अवघ्या काही तासांत कामं उरकून परतत आहेत. बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात जगत आहेत. या संकटातून मार्ग काढणे आवश्यक आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याच्या समस्येकडे गांभिर्याने बघावे. बिबट्यांची समस्या सोडवण्यासाठी दोन रेस्क्यू सेंटर अर्थात बिबट्या बचाव केंद्र सुरू करावी. यातील एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आणि एक अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू करावे. उभारलेल्या दोन पैकी एका रेस्क्यू सेंटरमध्ये नर बिबटे आणि दुसऱ्या सेंटरमध्ये मादी बिबट्यांची व्यवस्था करावी. वर्ल्ड वाईज नावाची संस्था बिबट्याची देखभाल करण्यास तयार आहे. रेस्क्यू सेंटरसाठी शासनाने निधीची व्यवस्था करावी. प्रत्येक सेटंरमध्ये किमान एक हजार बिबट्यांची कायमस्वरुपी राहण्याची व्यवस्था करावी; अशी मागणी शिवसेना आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात माणूस मेल्यानंतर २५ लाख रुपये देतात. पण २५ लाखांत आमचा माणूस परत येत नाही ना .. आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे १७ कोटी दिलेत . साडे १७ कोटी रुपयांची माती झाली, असे सांगत शरद सोनावणे यांनी बिबट्यांचा प्रश्न सोडवम्यासाठी तातडीने उपाय करण्याची मागणी केली.