नागपूर : कित्येक वर्षांपासून बहुचर्चित नाशिक - पुणे लोहमार्ग होण्याच्या दिशेने गंभीरपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. पण अचानक रेल्वे प्रशासनाने प्रस्तावीत मार्गात बदल केला आहे. यामुळे नाशिककर संतापले आहेत.
पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग आता अहिल्यानगर - शिर्डीमार्गे जाणार आहे. या बदलामुळे संगमनेरसह संपूर्ण दक्षिण अहिल्यानगर जिल्हा रेल्वेसेवेपासून दूर जाणार आहे. स्थानिकांच्या विकासाच्या संधी हिरावून घेणारा हा निर्णय असल्याचे संगमनेरमधील संघटनांचे मत आहे. नाशिक - पुणे रेल्वेमार्गाचे तीन वेळा सर्वेक्षण झाले असताना अचानक मार्ग बदलण्यात आल्याने नाराजी पसरली आहे.
नाशिक- पुणे रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे व्हावा हे आपले अनेक वर्षांचे स्वप्न आहे, या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल २०२० मध्ये मंजूर झाला होता. महारेलने भूसंपादनाची प्रक्रियाही सुरु केली होती, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात भूसंपादनही झाले होते. मात्र २०२५ मध्ये अचानक शिर्डी मार्गे नव्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. अहिल्यानगर , संगमनेर मार्गे होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांना आपला माल पुणे शहरात पोहोचवण्यास मदत होईल इतकंच नाही तर पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल. हा मुद्दा अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात मांडला आहे. तर जिल्ह्यातील राजकारण दूर ठेवून या निर्णयासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे, असे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले आहे.