सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील जवळपास १०३ वर्षे जुना असलेला ब्रिटिशकालीन रोड ओव्हर ब्रिज अखेर पाडण्यात येत आहे. हा पूल १९२२ साली उभारण्यात आला होता. रेल्वेने १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते रात्री ७.३० या वेळेत ११ तासांचा मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला असून, या काळात सोलापूर यार्डातील सर्व मेन लाईन आणि लूप लाईनवर वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे सोलापूर विभागातील हजारो प्रवाशांच्या रेल्वे प्रवासावर थेट परिणाम होणार आहे.
या ब्लॉकमुळे सोलापूर विभागातील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द, मार्गांतरित, उशिराने धावणार किंवा शॉर्ट-टर्मिनेट करण्यात येणार आहेत. विशेषतः सोलापूर–पुणे दरम्यानची इंटरसिटी (इंद्रायणी एक्सप्रेस) १४डिसेंबर रोजी कुर्डूवाडीपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे सोलापूर–पुणे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय वाढणार आहे. तसेच बागलकोट–म्हैसूर एक्सप्रेस त्या दिवशी १२.३० वाजता बागलकोटहून सुटेल.
१४ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या ९ गाड्यांमध्ये होस्पेट–सोलापूर डेमू, सोलापूर–पुणे डेमू, वाडी–सोलापूर डेमू, सोलापूर–दौंड डेमू विशेष यांसह एकूण नऊ स्थानिक व विशेष गाड्यांचा समावेश आहे. त्याच दिवशी नऊ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. गोलगुंबझ एक्सप्रेस, विजापूर–रायचूर पॅसेंजर, तिरुअनंतपुरम–मुंबई एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, एलटीटी–विशाखापट्टणम, पुणे–सिकंदराबाद शताब्दी अशा प्रमुख लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गांवरून धावतील.
शॉर्ट-टर्मिनेशनमध्ये सर्वाधिक फटका सोलापूरकरांना बसणार आहे. पुणे–सोलापूर इंटरसिटी (इंद्रायणी) १४ डिसेंबर रोजी कुर्डूवाडीपर्यंतच येणार असून तेथूनच परतीस धावेल. त्याचप्रमाणे हसन–सोलापूर एक्सप्रेस १३ डिसेंबर रोजी कलबुर्गीपर्यंतच येणार आहे.
१३ आणि १४ डिसेंबर रोजी काही लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने सुटतील. त्यात कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, सिकंदराबाद–पुणे शताब्दी अशा गाड्यांचा समावेश आहे.
१५ डिसेंबरला सकाळी ११.१० ते १३.४० या वेळेत २.५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात सोलापूर–होस्पेट डेमू, होस्पेट–सोलापूर डेमू आणि सोलापूर–पुणे डेमू रद्द राहतील. त्याच दिवशी काही गाड्या 30 मिनिटांनी उशिराने सुटतील.
१७ डिसेंबरला UP लाईनवर आणि १८–१९ डिसेंबरला DN लाईनवर प्रत्येकी ३.५ तासांचे ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे सोलापूर–हसन, बागलकोट–म्हैसूर आणि कन्याकुमारी–पुणे एक्सप्रेससारख्या गाड्या उशिराने धावतील अथवा होटगीपर्यंतच येऊन परतीस निघतील.