मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी जगभरात ओळख असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनाच्या (जीआय टँग) मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यातील हापूस आंब्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या मानांकनाला गुजरातकडून थेट आव्हान दिले गेले आहे. गुजरात सरकारच्या पाठबळावर ‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यात आल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
२०१८ मध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली असतानाच नवीन दाव्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘कोकण हापूस’ हा जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा आहे, २०१८ साली मिळालेल्या या जीआय टॅगमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व परिसरातील हापूस उत्पादकांना बाजारात वेगळी ओळख, चांगला दर आणि संरक्षण मिळाले.
कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर २०२२ मध्ये शिवनेरी हापूस आंबा नावाने भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला. त्यावर ३० ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली. गुजरातमधील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून २०२३ मध्ये ‘वलसाड हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
भेसळीचा प्रश्न अद्यापही गंभीर : सध्या कर्नाटक, केरळ, तमिळनाडू तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातील आंब्यांची ‘कोकण हापूस’ म्हणून भेसळ केली जाते. भेसळ रोखण्यासाठी क्यूआर कोडसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या, तरीही गैरप्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत ‘वलसाड हापूस’ला मानांकन मिळाल्यास भेसळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘कोकण हापूस’ हे नाव कोणत्याही एका राज्यासाठी नसून विशिष्ट भौगोलिक, हवामान आणि मातीच्या परिस्थितीत पिकलेल्या आंब्यासाठी राखीव आहे. कोकणातील चार जिल्ह्यांतील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळेच या आंब्याची चव, रंग आणि टिकाऊपणा वेगळा ठरतो. जर गुजरातच्या ‘वलसाड हापूस’ला स्वतंत्र जीआय टॅग मिळाला, तर कोकणातील हजारो आंबा उत्पादकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. यापूर्वी आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या ‘मलावी हापूस’ या नावावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. भविष्यात ‘कर्नाटक हापूस’ किंवा अन्य नावांनी अर्ज झाले, तरी त्यालाही कडाडून विरोध केला जाईल.- डॉ. विवेक भिडे, कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटना