मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’चा आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष विराट कोहलीवर असेल. सलग दोन सामन्यांमध्ये शतके झळकावून विराट कोहलीने हे सिद्ध केले आहे की फॉर्ममध्ये असताना जगातील कुठलाही गोलंदाज त्याच्यापुढे फिकाच पडतो. तशातच मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराटला सात वर्षांपूर्वीचा पराक्रम पुन्हा करण्याची संधी आहे.
विराट कोहलीने मालिकेची सुरुवात १३५ धावांच्या शानदार खेळीने केली होती. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळाला. दुसऱ्या सामन्यातही त्याने १०२ धावांचे शतक झळकावले, पण संघाला पराभव पत्करावा लागला. सलग दोन शतकांसह तो आता अशा टप्प्यावर आहे, जिथे आणखी एक शतक त्याला क्रिकेट इतिहासात एक खास स्थान मिळवून देईल. त्याच्याकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. विराटने त्याच्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत फक्त एकदाच सलग तीन शतके झळकावली आहेत. त्याने २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता पुन्हा अशीच कामगिरी केल्यास ही त्याची कारकिर्दीतील शतकांची दुसरी हॅटट्रिक ठरेल. आतापर्यंत फक्त पाकिस्तानच्या बाबर आझमनेच दोनदा ही कामगिरी केली आहे. जर विराटने ही कामगिरी केली, तर तो या खास क्लबचा दुसरा खेळाडू ठरेल.
विशाखापट्टणममधील खेळीकडे लक्ष : २०१८ मध्ये जेव्हा विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध शतकांची हॅटट्रिक केली होती, तेव्हा त्यापैकी एक शतक विशाखापट्टणममध्ये आले होते. विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने नाबाद १५७ धावा केल्या होत्या. आता सात वर्षांनंतर विराटला दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा एकदिवसीय सामना याच विशाखापट्टणमच्या मैदानात खेळणार आहे.