मध्य आणि मराठवाडा विभागात तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या सरींचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटप्रदेशात गारठा वाढत असून पुढील काही दिवस थंडी आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत वातावरणातून मिळत आहेत.
राज्यात पुढील २४ तासांत मुंबई व उपनगरांमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत हलक्या पावसासह थंडीची लाट जाणवू शकते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळी वारे दुर्बल झाले असले तरी, ते आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित झाले असून १ डिसेंबरला ते उत्तर तामिळनाडू–पुदुच्चेरी किनाऱ्यापासून २० किमी अंतरावर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.