Monday, December 1, 2025

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!

महाराष्ट्रात गारठा वाढला, काही भागांत पावसाची शक्यता!
पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या 'दितवाह' चक्रीवादळाचा परिणाम देशभर जाणवू लागला असून, अनेक राज्यांमध्ये वातावरण ढगाळ, तर उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढला आहे. पर्वतीय प्रदेशात हिमवर्षाव पुन्हा सुरु झाल्याने थंड वारे देशभर पसरत आहेत. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसत असून, पहाटेच्या वेळेत गारठा तीव्र जाणवत आहे. दिवसभरात तापमान स्थिर राहिले तरी सायंकाळनंतर थंडीचा गारठा अधिक जाणवत असून, काही ठिकाणी किमान तापमान ७ अंशापर्यंत खाली आले आहे. मध्य आणि मराठवाडा विभागात तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या सरींचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर घाटप्रदेशात गारठा वाढत असून पुढील काही दिवस थंडी आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत वातावरणातून मिळत आहेत. राज्यात पुढील २४ तासांत मुंबई व उपनगरांमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे. तर जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांत हलक्या पावसासह थंडीची लाट जाणवू शकते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळी वारे दुर्बल झाले असले तरी, ते आता तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात परिवर्तित झाले असून १ डिसेंबरला ते उत्तर तामिळनाडू–पुदुच्चेरी किनाऱ्यापासून २० किमी अंतरावर येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा