मुंबई : मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्य आणि भावनांचा संगम घेऊन ‘शंकर जयकिशन’ हे नाटक रसिकांच्या भेटीला येत आहे. वडील-मुलीच्या नात्यातील गुंतागुंती, वर्षानुवर्षं दडलेल्या भावना आणि एक अनोळखी व्यक्तीच्या अचानक प्रवेशामुळे बदलणारे आयुष्य असे याचे कथानक आहे. तिसऱ्या व्यक्तीच्या आगमनामागचं कारण , त्याच्या आयुष्यात दडलेलं गूढ नेमकं कोणतं, याची उत्तरं प्रेक्षकांना नाटकातून मिळणार आहेत.
या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २९ वर्षांनंतर महेश मांजरेकर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत आणि त्यांच्यासोबत भारत जाधवही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी खास भेट ठरणार आहे.दिग्दर्शक सुरज पारसनीस म्हणाले की, हे नाटक केवळ हसवणार नाही, तर नात्यांमधील न दिसणाऱ्या धाग्यांनाही स्पर्श करणार आहे. मैत्री आणि पित्याच्या भावविश्वाची एक वेगळी बाजू या नाटकातून उलगडेल.
निर्माते आणि अभिनेते भारत जाधव यांनी सांगितलं, “महेशजी आणि मी अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अनेक चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं आहे. एकमेकांकडून काय अपेक्षित आहे, हे आम्हाला चांगलं माहीत असल्यामुळे आमच्या जोडीकडून प्रेक्षकांना वेगळा अनुभव मिळेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
महेश मांजरेकर म्हणाले, “रंगभूमीवर परत येणं माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. नाटक नेहमीच माझ्या मनात पहिल्या क्रमांकावर आहे, पण चित्रपटांमुळे वेळ देता आला नाही. आता मात्र मी रंगभूमीसाठी अधिक वेळ देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक मला पहिल्याच वाचनात भावलं. भारतसोबत रंगमंचावर काम करण्याचा हा अनुभव प्रेक्षकांसाठीही खासच असणार आहे.”
भरत जाधव एंटरटेन्मेंट निर्मित, सुरज पारसनीस दिग्दर्शित आणि विराजस कुलकर्णी लिखित हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.