शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी
प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. इंदापूरपासून पुढे आणि माणगाव बायपासचे कूर्मगतीने सुरू असलेले काम यामुळे दररोजची डोकेदुखी असलेल्या माणगाव ट्रॅफिक जाम आणि त्यात अजून महामार्गावर होणारे अपघात यामुळे भर पडत आहे. बुधवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास माणगावपासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कळमजे पुलाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई-मालवण शिवशाही बस व सी. एन. जी. सिलेंडर वाहतूक करणाऱ्या अशोक लेलंडमध्ये ट्रक समोरासमोर जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात शाम गावडे यांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता मुंबई येथे हलविण्यात आहे.
सविस्त वृत्त असे की, बुधवार हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असून शिवशाही बसच्या दर्शनी भागापासून मागील काही भाग कापून गेला. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे तसेच वाहतूक पोलीस हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत अपघात ठीकाणी तातडीने दाखल होऊन त्यांनी जखमींना स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्गावरील प्रवाशांच्या मदतीने औषोधोपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. मुंबईहून मालवणकडे निघालेली शिवशाही बस व माणगाव बाजूकडून मुंबईकडे सीएनजी गॅस वाहतूक करणारा अशोक लेलंड ट्रॅक या वाहनांची माणगावजवळलील कळमजे पुलाजवळ मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धडक लागून भीषण अपघात घडला. या अपघातात शाम गावडे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंकुश मेस्त्री, शशिकांत तावडे, प्रशांत राजशिर्के, सुप्रिया मोरे, प्रतिभा नागवेकर, आर्या मयेकर, गायत्री मयेकर, अक्षता पोळवणकर, दीपाली मोकळ, आयशा मयेकर, हे दहाजण जखमी झाले. हा अपघात अत्यंत भीषण होता. अशोक लेलंडमध्ये सिएनजी गॅस असल्याने त्याचा स्फोट होतो की काय याची भीती होती. या अपघातामुळे मुंबई - गोवा महामार्गावर काहीकाळ वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. काही तासांनी वाहतुक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.