अमरावती : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यातील निवडणूकांसाठी प्रचार सुरू आहे. यासाठी सर्व पक्षाचे नेते महाराष्ट्रभर प्रचारासाठी दौरे करत आहेत. याप्रमाणेच नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीमधील धारणी येथे गेले होते. यावेळी, स्थानिक प्रश्न सांगून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न एका महिलेने केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सभा आटोपल्या नंतर परतीसाठी निघतानाच्या दरम्यान 'देवेंद्र' अशी हाक या महिलेने दिली.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्र म्हणून हाक दिल्याने सगळे अधिकारी, कर्मचारी, सोबतचे नेतेही एकमेकांकडे पाहू लागले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तत्काळ मागे वळून पाहिले. त्यावेळी शेजारी उभा राहिलेल्या महिलेने त्यांना नारळ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करत काही मिनिटांच्या भेटीत मेळघाटातील समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांचा शब्द
या महिलेने मुख्यमंत्र्यांना मेळघाटातील समस्यांबाबत सांगितले. मेळघाटात रस्ता, नाले आणि पाण्याची समस्या सर्वात जास्त आहे. नागरिकांना याच तीन समस्या प्रामुख्याने भेडसावतात, हा समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, असे या महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर , मला त्यांना एवढेच सांगायचे होते की मेळघाटात असे मी त्यांना सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच समस्यांवर मार्ग काढण्यात येईल असा शब्द दिला.
मुख्यमंत्री आणि 'त्या' महिलेचे नाते काय?
संबंधित महिला हि मुळची धारणी गावची असून मेळघाटातील सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ती आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल हे देवेंद्र फडणवीस यांचे मूळगाव आणि या महिलेचे माहेर आहे.यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहिणी या महिलेच्या शालेय मैत्रीणी होत्या. एकाच वर्गात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्येसुद्धा सर्वांसोबत ओळख होती. त्यामुळे लहानपणी घरी येणंजाणं असल्याने मुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवले असल्याचे महिलेने सांगितले. याच नात्यातील आपुलकीने या महिलेने मुख्यमंत्र्यांना देवेंद्र अशी हाक दिली. आमची ओळख असल्यामुळे मी त्याला आवाज दिला आणि म्हणूनच तो आला नाहीतर आला नसता, असेही शेवटी या महिलेने मिश्किलपणे सांगितले.