मनसेसाठी आपल्याच नगरसेवकांना घरी बसवण्याची वेळ येणार उबाठावर
मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेत भाजपा शिवसेनेने मनसेला पाठिंबा दिल्यानंतरही मनसे नेते आणि उमेदवार बाळा नांदगावकर यांचा ७ हजार मतांनी पराभव झाला. परंतु आता हीच मनसे उबाठा शिवसेनेसोबत जावून महापालिका निवडणूक लढवणार आहे. पण शिवडी विधानसभेत उबाठाचे पाचही नगरसेवक असून मनसेसोबत युती केल्यास या विधानसभेत कुठे सामावून घ्यायचे हाच प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे. शिवडीत उबाठाची मनसेला जागा सोडण्यासाठी मोठी पंचाईत होणार असून मनसेला एक किंवा दोन जागा सोडायच्या झाल्यास उबाठाच्या नगरसेवकांना घरी बसवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे शिवडीत मनसेला ऍडजस्ट करण्यासाठी उबाठाला आपल्या नगरसेवकांचा बळी चढवावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवडी विधानसभेत पाच महापालिका प्रभाग असून त्यासर्व प्रभागांमधून उबाठाचे नगरसेवक निवडून आले आहेत. यासर्व प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक २०२, प्रभाग क्रमांक२०४ आणि प्रभाग क्रमांक २०६ हे तीन प्रभाग सर्वसाधारण खुले झाले आहेत. तर प्रभाग क्रमांक २०३ आणि प्रभाग क्रमांक २०५ हे प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. या विधानसभेतील प्रभाग क्रमांक २०३ आणि प्रभाग क्रमांक २०६वर मनसेचा प्रमुख दावा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रभाग क्रमांक २०३ हा महिला आरक्षित कायम राहिल्याने या मतदार संघातून उबाठामधून सिंधु मसुरकर यांच्यासमवेत इच्छुकांची यादी मोठी आहे. पण याच मतदार संघाची बांधणी मनसेकडून केली जात आहे. याच मतदार संघात मनसेने कोकण महोत्सव भरवला आहे. त्यामुळे मनसेकडून या प्रभागात शाखाध्यक्ष निलेश इंदप हे आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे. इंदप यांनी कोकण महोत्सव भरवला आहे आणि यासाठी खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यामुळे या प्रभागावर मनसेचा दावा पक्का मानला जाणार असून तसे झाल्यास सिंधु मसुररकर यांच्यासह दगडू सकपाळ यांच्या मुलगी रेश्मा सकपाळ आणि इतरांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. तसेच मनसेचा दुसरा दावा हा प्रभाग क्रमांक २०६मध्ये असेल. हा प्रभाग मनसेसाठी अनुकूल असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह राज ठाकरे यांच्या जवळ असलेल्या चेतन पेडणेकर या प्रभागातून इच्छुक आहेत. या प्रभागातून उबाठाचे सचिन पडवळ हे निवडून आलेले आहेत. पडवळ हे अभ्यासू नगरसेवक असले तरी या प्रभागातून किशोर वाळुंज हे इच्छुक आहेत. या दोघांचा वादात हा प्रभाग मनसेला सोडला जाणार का असा प्रश्न आहे. पाच जागा उबाठाकडे असल्याने मनसेला केवळ एक जागा सोडली जाते की दोन जागा दिल्या जातात याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मनसेसोबत युती केल्यास याचा पहिला फटका जागा वाटपात उबाठाला शिवडी मतदार संघात बसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेला सामावून घेण्यासाठी आपल्या नगरसेवकाचा पत्ता कापण्याची वेळ येणार आहे, यामुळे भविष्यात शिवडी विधानसभेत नाराजी नाट्य पहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूक २०२४मधील शिवडी विधानसभेतील मतदान
- अरविंद सावंत उबाठा: ७६, ०५३
- यामिनी जाधव शिवसेना: ५९,१५०
शिवडी विधानसभा २०२४चा निकाल
- अजय चौधरी उबाठा : ७४,८९०
- बाळा नांदगावकर,मनसे : ६७,७५०
प्रभाग क्रमांक २०२ (सर्वसाधारण खुला)
हा प्रभाग आधी महिला असला तरी आगामी निवडणुकीत तो सर्वसाधारण अर्थात खुला झाला आहे. या भागातून आजवर सहावेळा निवडून आलेल्या माजी महापौर श्रद्धा जाधव या उबाठाच्या नगरसेविका आहे. हा प्रभाग खुला झाल्याने श्रद्धा जाधव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि उबाठा युवा सेनेचे पदाधिकारी पवन जाधव यांचे नाव चर्चेत आहे. पवन जाधव बरोबरच त्यांच्या पक्षाचे शाखाप्रमुख इंदुलकर याचे नाव चर्चेत आहे. हा प्रभाग भाजपा सुटण्याचीची शक्यता असून भाजपकडून पार्थ बावकर यांच्या नावाची तर मनसेकडून प्रसाद सरफरे यांच्या नावाची चर्चा आहे. श्रद्धा जाधव या वडाळा विधानसभेतील आपल्या जुन्या प्रभागात जिथे तो प्रभाग महिला आरक्षित झाला आहे, तिथे जाणार असल्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक २०३ (महिला)
हा प्रभाग पुन्हा एकदा महिला आरक्षित झाला असून मागील निवडणुकीत नाना आंबोले यांच्या पत्नीचा पराभव करून विजयी झालेल्या सिंधू मसुरकर या पुन्हा इच्छुक आहेत. तर याभागात त्यांच्यासमोर उमेदवारी मिळवताना मोठी अडचण आहे. या प्रभागात माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या आणि युवा सेना पदाधिकारी रेश्मा सकपाळ.दिव्या बडवे, भरती पेडणेकर, दर्शना पाटकर याही इच्छुक आहेत. तर आमदार अजय चौधरी यांची गौरी चौधरी यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत आहे. तर भाजपकडून राजेश्री हाटले,राखी शेटे, साक्षी दरेकर, शिवसेनेकडून तेजस्विनी आंबोले, मनीषा राणावडे आणि मनसेकडू आसावरी जाधव आणि शाखाध्यक्ष इंदप यांची पत्नी आदींच्या नावाची चर्चा आहे. शिवडी विधानसभेतील या प्रभागातील लढत ही लक्षणीय ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक २०४ (सर्वसाधारण खुला)
हा प्रभाग पुन्हा एकदा सर्वसाधारण झाला आहे. प्रभाग पुन्हा खुला राहिल्याने उबाठाचे नगरसेवक माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांची दावेदारी कायम राहिली आहे. पण यंदा कोकिळ यांना त्यांच्याच पक्षाचे किरण तावडे यांचे आव्हान आहे. उबाठाकडून तावडेही इच्छुक आहेत. भाजपकडून अरुण दळवी, मनसेकडून विक्रांत विचारे आणि संतोष नलावडे आणि शिवसेकडून अतुल मावळे यांच्या नावाची इच्छुक म्हणून चर्चा आहे.
प्रभाग २०५ (महिला)
हा प्रभाग आधी सर्वसाधारण असल्यामुळे उबाठाचे दत्ता पोंगडे हे नगरसेवक निवडून आले होते. पण आता हा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने या प्रभागातून उबाठाकडून वैभवी चव्हाण, गौरी चौधरी, रुपाली चांदे या इच्छुकांच्या रांगेत आहेत. शिवसेनेकडून अनुराधा इनामदार यांच्या नावाची चर्चा आहे. वैभवी चव्हाण ही माजी नगरसेविका असून प्रभाग २०३ मध्ये वर्णी न लागल्यास गौरी चौधरी यांच्यासाठी आमदार अजय चौधरी शब्द टाकून यात आपल्या सुनेला उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.
प्रभाग २०६ (सर्वसाधारण)
या प्रभागातून उबाठाचा नगरसेवक सचिन पडवळ यांच्या रूपात निवडून आला. हा प्रभाग पुन्हा सर्वसाधारण झाल्याने सचिन पडवळ यांची उबाठा कडून प्रमुख दावेदारी असली तरी त्यांच्यासमोर त्यांच्या पक्षातून किशोर वाळुंज यांचे आव्हान असणार आहे. वाळुंज हे या प्रभागातून इच्छुक आहे. शिवसेनेकडून राम मोचन मुरारी हे इच्छुक आहे. तर मनसेकडून चेतन पेडणेकर हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे हा प्रभाग शिवसेनेला मनसेसाठी सोडावे लागल्यास सचिन पडवळ याला मागे हटावे लागणार आहे. हा प्रभाग मनसेसाठी पूरक असल्याने मनसेची इथे जोरदार मागणी राहणार असल्याचे बोलले जात आहे.