अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. या उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत असल्यानं त्यांना पुन्हा घरी आणलं गेलं होतं. त्यांच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा पाहून चाहतेही खूश होते; पण अखेर काल त्यांनी जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडचा ही-मॅन हरपला.


धर्मेंद्र यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक बॉलिवूड सिनेमे केले. त्यांच्या अभिनयानं त्यांनी गेली सहा दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशाच या हरहुन्नरी अभिनेत्यानं आज निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्यानं मनोरंजनसृष्टीत नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे.


धर्मेंद्र यांचे खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल आहे; परंतु चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर ते धर्मेंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावात एका जाट शीख कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लालटन कलान येथे केले. जिथे त्यांचे वडील केवल कृष्ण हे मुख्याध्यापक होते. त्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या इंटरमीडिएट शिक्षणासाठी फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते, परंतु अभिनयाची त्यांची आवड त्यांना मागे टाकत गेली आणि ते पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत.



सिनेमामध्ये काम करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. एका मासिकाच्या काँटेस्टंटसाठी ते मुंबईत आले होते. पण, कलाकार म्हटलं की, संघर्ष हा चुकत नाही. धर्मेंद्र यांनाही सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला. तेव्हा त्यांचं मंबईत घर नव्हतं. त्यामुळे ते गॅरेजमध्ये राहिले आणि त्यांनी ड्रिलिंग फर्ममध्ये काम केलं. जिथे त्यांना २०० रुपये मिळायचे आणि थोडे जास्त पैसे कमावण्यासाठी ते ओव्हरटाइम करायचे. पण, शेवटी धर्मेंद्र यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना कॅमेऱ्यासमोर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. १९६० मध्ये धर्मेंद्र यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर काही वर्षांनी ते ‘बांदनी’, ‘हकीकत’ आणि इतर काही चित्रपटांत झळकले. हळूहळू विविध भूमिका साकारत ते हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार बनले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. धर्मेंद्र यांनी 'शोले और शबनम', 'अनपढ' 'शोले', 'सीता और गीता', 'धरम वीर', ‘यादों की बारात', 'चरस' आणि 'चुपके चुपके' यासह अनेक हिट चित्रपट दिले. धर्मेंद्र यांचा 'इक्कीस'(Ikkis) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच इक्कीसचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षीपर्यंत ते सिनेइडंस्ट्रीत कार्यरत होते. या वयातही ते सोशल मीडियावर सक्रिय असायचे.



सुरुवातीला धर्मेंद्र एकटेच मुंबईत राहत होते; पण यशस्वी झाल्यानंतर त्यांनी घर खरेदी केलं आणि त्यांच्या आई-वडिलांना व पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांना मुंबईत बोलावून घेतलं. धर्मेंद्र यांनी १९ वर्षांचे असताना १९५४ मध्ये प्रकाश कौरशी लग्न केले. त्यांना सनी देओल, बॉबी देओल , अजिता आणि विजेता ही मुलं होती. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये हेमा मालिनीशी लग्न केले. चित्रपटांमध्ये काम करताना धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना ईशा आणि इहाना अशा दोन मुली आहेत.


लुक्स आणि दिसण्याच्या बाबतीत धर्मेंद्र यांना कोणताही अभिनेता टक्कर देऊ शकला नाही. १९७० मध्ये, धर्मेंद्र यांना जगातील सर्वात देखण्या पुरुषाचा पुरस्कारदेखील मिळाला होता. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आणि फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


 


धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबिय, सहकलाकार, अन् चाहतेही भावुक झाले आहेत. धमेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


बॉलिवूडचे एव्हरग्रीन सुपरस्टार आणि लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करणारे धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने देशभरात शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील या अमूल्य व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राजकारणापासून ते मनोरंजन विश्वापर्यंत अनेक दिग्गजांनी धर्मेंद्रच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


ज्येष्ठ अभिनेते आणि माजी खासदार धर्मेंद्रजी यांचं निधन भारतीय चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान आहे. सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या त्यांनी त्यांच्या दशकांच्या शानदार कारकिर्दीत अनेक संस्मरणीय कामगिरी केल्या. - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू


महान अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे आणि भारतीय कला जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.  - काँग्रेस नेते राहुल गांधी


आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. 'शोले'मध्ये त्यांनी साकारलेला 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख


धर्मेंद्र हे त्यांच्या कुटुंबाची काळजी घ्यायचे, त्याचप्रमाणे त्यांच्याशी मैत्री केलेल्या प्रत्येकाची ते काळजी घ्यायचे. त्यांच्यासारखा ग्रेट स्वभावाचा माणूस शोधूनही सापडणार नाही. त्यांनी आजवर अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत असत. मागच्या काही काळापासून आम्ही फोनवरही बोलायचो. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत बिघडली होती. मला वाटलं की ते बरे होतील. ८ डिसेंबरला ते ९० वर्षांचे झाले असते आणि मी ८१ वर्षांची. पण आता मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. - शर्मिला टागोर


"ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी." - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे


'धरमजी यांच्याशी माझे जुने असोसिएशन आहे, १९५८-५९ पासून आम्ही दोघे एकत्र आलो होतो. आम्ही दोघांनी खूप संघर्ष पाहिला आहे आणि साऱ्या गोष्टी कॉमन देखील आहेत. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत आणि जेव्हा देखील शोले चित्रपटात कुणाला घ्यायचं, हा विचार आला तेव्हा सर्वात पहिल्यांदा धरमजींचा विचार.’ - सलीम खान


शब्दच कमी पडतात... सर्वांमध्ये सर्वात देखणा आणि सर्वात छान माणूस. RIP #धर्मेंद्र तुमच्या प्रवेशाने स्वर्ग आणखी सुंदर होईल!! धरम जी, तुम्ही सुपरस्टार होता आणि बॉलिवूडच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुपरस्टार राहाल. #धर्मेंद्र देओल. - ऊर्मिला मातोंडकर


'सर्वांत देखणे, दिग्गज धरमजी आपल्याला सोडून गेले... पण त्यांचा वारसा कायम राहील. मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याकरता मी कृतज्ञ आहे. हा रिअल ही-मॅन आपल्या हृदयात कायमच जिवंत राहतील. ओम शांती.' - सचिन पिळगांवकर


क्षितीनं ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवरील आठवण शेअर करीत म्हटलं, “धर्मेंद्र अनेकदा सेटवर कविता म्हणायचे. त्यांनी अनेक कविता वाचलेल्या असायच्या, त्या त्यांच्या लक्षात असायच्या आणि त्या आम्हाला ते सेटवर वाचून दाखवायचे. जुने किस्से, आठवणी शेअर करायचे. त्यांच्याबरोबर काम करताना फार मजा आली. पण, आता ते आपल्यात नाहीत हे ऐकून भरून आलं आहे. ते कायमच आपल्या स्मरणात राहतील, देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”


- क्षिती जोग


'असं वाटत आहे की, जसे की दुसऱ्यांदा वडिलांना गमावले आहे.' - कपिल शर्मा


 

 
Comments
Add Comment

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता