मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला आहे. २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी जुहू येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी पुन्हा भरून येणारी नाही, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्यांचे चाहते 'धरमपाजीं'च्या जाण्याने भावूक झाले आहेत. कारण, काही व्यक्ती अशा असतात ज्यांची आठवण पुसता येणे शक्य नसते आणि धर्मेंद्र याच व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी आहेत. धर्मेंद्र यांचे खास मित्र आणि 'शोले' या आयकॉनिक चित्रपटात त्यांच्यासोबत 'जय' ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'शोले'मध्ये 'जय आणि विरू' या जोडीने पडद्यावर जी मैत्री साकारली, ती वास्तवातही खूप घट्ट होती. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबीयांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 'धरमपाजीं'च्या निधनाने त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
‘विरू’ला अखेरचा निरोप देताना ‘जय’ अस्वस्थ
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांचे जिवलग मित्र आणि 'शोले'मधील सहकलाकार अमिताभ बच्चन यांना मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन अत्यंत अस्वस्थ झाले होते आणि त्यांनी आपल्या मित्राला भावपूर्ण निरोप दिला. धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन आपले पुत्र अभिषेक बच्चन यांच्यासह अंत्यसंस्काराला उपस्थित होते. आपल्या 'विरू'ला अखेरचा निरोप देताना अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर तीव्र दुःख आणि अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांची तब्येत ठीक नसताना अमिताभ बच्चन स्वतः गाडी चालवत त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, सोमवारी त्यांच्या निधनाची बातमी आल्याने त्यांच्यावर शोककळा पसरली. मित्राला गमावल्याचे दुःख व्यक्त करत अमिताभ बच्चन यांनी रात्री उशिरा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जिवलग मित्राच्या आठवणी सांगणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली. 'धरमपाजीं'च्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका महान मैत्रीचा अंत झाला, अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.
'वीरू'च्या आठवणीत 'जय' निशब्द... अमिताभ बच्चन यांची मन हेलावणारी पोस्ट
पंजाबच्या मातीतून आकाराला आलेलं शिल्प म्हणजे धर्मेंद्र. बलदंड शरीर, तितकाच सोज्वळ चेहरा आणि दमदार अभिनय. अलीकडच्या काळात कारकिर्दीनंतरचा निवांतपणा ...
अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "आणखी एक महान व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. एक रिकामपण भरुन राहिलंय. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली शांतता असह्य आहे." धर्मेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना बिग बी पुढे म्हणाले, "एक निशब्द शांतता पसरलीय. धरम जी महानतेचे प्रतीक होते. त्यांचं भव्य व्यक्तिमत्त्व, विशाल हृदय आणि अद्भुत साधेपणा यासाठी ते कायम स्मरणात राहतील." अमिताभ बच्चन यांच्या या शब्दांतून धर्मेंद्र यांच्या निधनाचा त्यांना किती मोठा धक्का बसला आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. 'जय आणि वीरू'च्या मैत्रीची ही आठवण चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे.
'पंजाबी मातीचा सुगंध आयुष्यभर जपला...
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, "ते पंजाबच्या गावातील मातीचा सुगंध घेऊन आले आणि आयुष्यभर तो जपला. जेव्हा प्रत्येक दशकात खूप काही बदलत राहिले, अशा काळातही त्यांच्या भव्य फिल्मी प्रवासात ते कायम निष्कलंक राहिले." धर्मेंद्र यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणतात, "त्यांच्या जाण्याने आपल्या आजूबाजूची हवा हलकी झाल्यासारखी वाटते. हे असे एक रिक्त स्थान आहे, जे कधी भरून निघणार नाही..." असे म्हणत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन हे दोन्ही दिग्गज कलाकार शेवटपर्यंत चित्रपटविश्वात सक्रिय होते. 'वीरू'च्या अचानक जाण्याने 'जय'ने लिहिलेली ही अतिशय भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहतेही आपल्या लाडक्या 'धरमपाजीं'च्या आठवणीत रमत आहेत.