मुंबई : महाविद्यालय आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय चुकीमुळे एका विद्यार्थ्याला तब्बल नऊ वर्षे योग्य बारावीची गुणपत्रिका मिळाली नाही. या विलंबामुळे त्याचे करिअर गंभीर अडचणीत सापडले यामुळे त्याला व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा देण्याची संधीही गमवावी लागली . शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत विद्यार्थ्याला दिलासा दिला असून, आवश्यक शुल्क भरताच त्याला २०१६ च्या परीक्षेची गुणपत्रिका १५ दिवसांत आणि प्रमाणपत्र ३० दिवसांत देण्याचा आदेश न्यायालयाने मंडळ व महाविद्यालयाला दिला आहे.
न्यायालयाने आपल्या निर्णयात महाविद्यालय आणि मंडळाच्या सलग चुकांसाठी कठोर शब्दांत ठणकावले न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सांगितले की', संस्थांच्या त्रुटींमुळे विद्यार्थ्याला दंड भोगावा लागणे अन्यायकारक आहे. अशा प्रकरणांत व्यावहारिक दृष्टीकोन ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. सोबतच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
न्यायालयाने आदेशात म्हटले की, विद्यार्थ्याला गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देण्यात यावे, जेणेकरून तो कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या निकालाचा उपयोग करू शकेल.
नेमके काय घडले?
विद्यार्थी ओंकारने २०१६ च्या बारावी परीक्षेचा निकाल घोषित करावा यासाठी २०२३ मध्ये याचिका दाखल केली होती. नोटीस बजावूनही मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ओंकारने २०१४ मध्ये ४५.५४% गुणांसह बारावी उत्तीर्ण केली होती. त्यानंतर गुणवत्ता सुधारणा योजनेअंतर्गत त्याने गुण वाढवण्याचा पर्याय निवडला. परंतु २०१५ मध्ये तो गुण सुधारत असताना अनुत्तीर्ण ठरला. त्याच वेळी महाविद्यालयाने त्याचा ऑनलाइन फॉर्म चुकीचा भरला. २०१५ मध्ये ‘सुधारणा’ विद्यार्थी दाखवण्याऐवजी ‘अनुत्तीर्ण’ दाखवले गेले. पुढे २०१६ मध्ये तो प्रत्यक्षात ‘रिपिटर’ असताना त्याला चुकीने ‘सुधारणा विद्यार्थी’ म्हणून दाखवण्यात आले. दोन्ही चुका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी २०१८ आणि २०२२ च्या पत्रांमध्ये मान्य केल्या.मंडळाकडून त्याला २०१४ च्या मूळ गुणांपैकी किंवा २०१५ च्या गुणांपैकी एक निवडण्याचा पर्याय देण्यात आल्याचा कोणताही पुरावा न्यायालयात सादर करता आला नाही.
गुण वाढले तरी विद्यार्थ्याचे नुकसानच
न्यायालयाने सांगितले की, मंडळाने २०१६ चा निकाल जाहीर न केल्याने विद्यार्थ्याचे नुकसान झाले. २०१६ मध्ये त्याचे गुण ५८.६१% पर्यंत वाढले होते. पण निकाल न मिळाल्याने त्याला पुढील शिक्षण आणि प्रवेश परीक्षा दोन्हीपासून दूर राहावे लागले. २०१४ च्या गुणांवर आधारित पीसीबीचे एकत्रित गुण ४५% पेक्षा कमी असल्याने तो पात्रताच गाठू शकला नाही. त्यामुळे गुण वाढूनही त्याच्या प्रगतीचा मार्ग बंद झाला.