मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जवळ आल्याने सर्व राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. अनेक ठिकाणी आजपासून प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढावे, असा सूर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे. विशेष म्हणजे, शिउबाठा आणि मनसेतील समीकरणे गेल्या काही महिन्यांत बदललेली दिसत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच गोटात एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
सर्वच पक्ष २०१७ मध्ये स्वतंत्रपणे मैदानात उतरले होते. निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपने एकत्र सत्ता स्थापन केली होती. अवघ्या दोन जागांच्या फरकामुळे दोन्ही पक्षांत स्पर्धा तगडी होती. आता आठ वर्षांनी राज्यातील संपूर्ण राजकीय नकाशा बदललेला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत. तर ठाकरे बंधू पुन्हा जवळ येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. अशा परिस्थितीत विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच महानगरपालिकेतही महाविकास आघाडीने एकत्रित लढावे आणि त्यात मनसेलाही सामील करून घ्यावे, असे मत आघाडीतील अनेक नेते व्यक्त करत आहेत.
मुंबई महापालिकेचा २०१७ मधील निकाल आणि आताच्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला असा असू शकतो :
शिवसेना – ८४ जागा जिंकल्या आणि ११० जागांवर लढण्याची शक्यता
काँग्रेस –३१ जागा जिंकल्या आणि ५५ जागांवर लढण्याची शक्यता
राष्ट्रवादी – ०९ जागा जिंकल्या आणि १२ जागांवर लढण्याची शक्यता
मनसे – ०७ जागा जिंकल्या आणि ५० जागांवर लढण्याची शक्यता
मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये मराठी, मराठा आणि मुस्लिम समाजाचे मत निर्णायक ठरते. काँग्रेसने २०१७ मध्ये स्वतंत्रपणे ३१ जागा जिंकत दलित, मुस्लिम, ख्रिश्चन आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले होते.
महाविकास आघाडीने पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली असून पवारांनीही भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची एकजूटच गरजेची असल्याचे मत नोंदवले आहे.