नारायणस्वामी यांचे आरोप अशा वेळी आले आहेत, जेव्हा माध्यमांमध्ये कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व बदलाची चर्चा जोर धरत आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने अलिकडेच अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सत्ता वाटपाचा करार झाला होता. त्यानुसार अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे कर्नाटकमध्ये आता सत्ता बदलाची चर्चा जोर धरू लागली आहे. काही काँग्रेस नेते या संभाव्य बदलाला 'नोव्हेंबर क्रांती' असेही म्हणत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
केंद्रीय मंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनीही कर्नाटकच्या राजकारणावर भाष्य केले आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत राज्यात 'अविश्वसनीय घटनाक्रम' पाहायला मिळतील, असे भाकीत त्यांनी केले आहे. राजकारणात कोण कधी काय निर्णय घेईल हे सांगणे अशक्य आहे आणि राज्यात सध्या अशीच 'क्रांती' होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने मात्र भाजपच्या नेत्यांचे आरोप फेटाळले आहेत.