सुरक्षा पथकांचा पवित्रा बघून नक्षलवादी शरण येऊ लागले. पण काही प्रमुख नक्षलवादी सरकार विरोधात सशस्त्र कारवाया सुरू ठेवण्याच्या प्रयत्नात होते. अखेर नक्षलवाद्यांचा मोठा नेता असलेला नक्षलवादी हिडमा हा सुरक्षा पथकाच्या कारवाईत ठार झाला. हिडमा चकमकीत ठार झाल्यानंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या भाकपा माओवादी नक्षलवाद्यांच्या गटातील ३७ नक्षलवाद्यांनी एकाचवेळी शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.
शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये हिडमाचा विश्वासू सहकारी कोय्याडा सम्बैयाह उर्फ आझाद याचाही समावेश आहे. आझाद हा मुलुगू जिल्ह्याचा रहिवासी असून तो ३१ वर्षे भूमिगत राहून सरकार विरोधात कारवाया करत होता. विशेष म्हणजे शरण आलेल्या ३७ जणांपैकी २५ नक्षलवादी या महिला आहेत. शरण आलेल्या नक्षलवाद्यांकडून सुरक्षा पथकाने आठ बंदुका, एक एके ४७ रायफल, मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि जिवंत काडतुसे जप्त केली. ही माहिती तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांनी दिली.
शरण आलेले तीन प्रमुख नक्षलवादी
कोय्याडा सम्बैयाह उर्फ आजाद, अप्पासी नारायण उर्फ रमेश, मुचाकी सोमाडा उर्फ एर्रा हे तीन नक्षलवादी नेते आणि त्यांचे समर्थक आंध्र तेलंगणा सीमेवर बस्तरच्या दक्षिणेकडील भागात सक्रीय होते. या नक्षलवाद्यांनी आता शरण येऊन शस्त्र त्याग केला आहे.