सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित
नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६ वर्षीय शौर्य पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने राजधानीतच नव्हे, तर महाराष्ट्रातही मोठे दुःख आणि संताप उसळला आहे. शौर्यने आत्महत्या करण्यापूर्वी दीड पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्याने शाळेच्या प्राचार्यांसह तीन शिक्षिकांना जबाबदार धरले आहे.
या घटनेनंतर शाळेबाहेर विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि नातेवाइकांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शौर्यच्या समर्थनार्थ शाळेबाहेर मोठा जमाव जमला होता. सर्वांचे एकच म्हणणे ‘दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, शौर्यला न्याय मिळालाच पाहिजे!’
शौर्यने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की, तो मानसिक छळाला कंटाळला आहे. सतत अपमान, शैक्षणिक भार, अन्यायकारक वागणूक आणि प्राचार्यांचा दबाव हे त्याच्या मानसिक त्रासाचे मुख्य कारण असल्याचे त्यात नमूद आहे. १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने चार शिक्षिकांचे निलंबन केले आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. समितीला १० दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालक व आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की हे निलंबन फक्त नावापुरता आहे व कारवाईचा देखावा केला जात आहे.