मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून प्रवाशांना विनाव्यत्यय इंटरनेटचा वापर करता येणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशन्स लिमिटेडसोबत प्रमुख स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी आणि डिजिटल मनोरंजन सेवांसाठी नुकताच नवी मुंबई येथे सामंजस्य करार केला. कोकण रेल्वेच्या मडगाव, रत्नागिरी, उडुपी या तीन रेल्वे स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी करण्यात येईल, तर टप्प्याटप्प्याने ब्लू क्लाउड इतर रेल्वे स्थानकांमध्ये त्यांची डिजिटल उत्पादने आणि ‘५ जी’ फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस सेवा पुरवली जाईल. कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ही सेवा पुरवेल. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीविना इंटरनेटद्वारे माहिती मिळविता येईल. ब्लू क्लाउड सॉफ्ट टेक सोल्युशन्स लिमिटेडसोबतची ही भागीदारी प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करण्याच्या वचनबद्धतेशी पूर्णपणे सुसंगत आहे. प्रमुख स्थानकांवर नाविन्यपूर्ण ‘५ जी’ नेटवर्क आणि डिजिटल मनोरंजन उपलब्ध करून दिल्याने, कोकण रेल्वेच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयी वाढविण्यासाठी, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि देशाच्या डिजिटल प्रगती आणि गतिशीलता उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी रेल्वे मार्गात अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले.