पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या ४,१८६ सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवून आता ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया पूर्ण न झालेल्या इच्छुकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. या योजनांसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १,३३,८८५ अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदवले गेले आहेत. सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा कार्यक्रम ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. अर्जदारांना ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने किंवा १ डिसेंबर २०२५ पर्यंत संबंधित बँकेच्या वेळेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
दरम्यान, अनेक अर्जदारांना कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक अडचणींमुळे अडथळे येत असल्याने तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी वाढली होती. नागरिकांच्या या मागणीचा आणि मिळालेल्या मोठ्या प्रतिसादाचा विचार करून ही मुदतवाढ “शेवटची संधी” म्हणून देण्यात आल्याचे पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या सोडतीबाबतचे सुधारित वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेली ही सोडत चार प्रमुख गटांत विभागण्यात आली आहे. यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजना (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य) अंतर्गत १,६८३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) FCFS अंतर्गत २९९ सदनिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील १५ टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिका आणि PMC, PCMC व PMRDA हद्दीतील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ३,२२२ सदनिकांचा समावेश आहे. या मुदतवाढीमुळे पुण्यात तसेच परिसरात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची आणखी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.