मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच अानुषंगाने बिहार निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून होत होती. त्यावरून शनिवारी झालेल्या मुंबई काँग्रेसच्या शिबिरात यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.मुंबई पालिकेतील सर्व वाॅर्डांमध्ये काँग्रेस उमेदवार उभे करण्याची तयारी आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ‘लक्ष्य २०२६’ साठी मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे शिबीर पार पडले. २२७ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. पक्षाची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व संपूर्ण पदाधिकाऱ्यांची हीच इच्छा आहे की, स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे.
मारहाण ही काँग्रेसची विचारधारा नाही
मुंबई काँग्रेसचे नेते, पदाधिकारी यांची मागणी येत्या महापालिकेत स्वबळावर लढले पाहिजे ही आहे. मागील काळात काँग्रेसने निवडणूक लढवली होती. शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते, त्यामुळे त्यांना जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल, तर त्यांची बाजू मी काँग्रेसच्या प्रभारींसमोर ठेवण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, कंत्राटदारांची लॉबी याविरोधात काम करणार आहोत. मुंबईकरांचा पैसा पक्षाचे फंडिंग म्हणून वापरला जात आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमातून आखण्यात आली होती. संविधानाला जोडणारा कार्यक्रम असला पाहिजे. मात्र काही पक्ष मारहाणीची भूमिका घेतात, लोकांना त्रास द्यायची भूमिका घेतात. त्यामुळे काँग्रेसची ही विचारधारा नाही, असे सांगत वर्षा गायकवाड यांनी नाव न घेता मनसेला टोला लगावला आहे.