नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन या तिघांशी संबंधित सुमारे २० लाख रुपयांच्या निधी संबंधी महत्त्वाची माहिती मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार निधी जैश-ए-मोहम्मदच्या हँडलरकडून हवाला मार्गाने पाठवला असावा, अशी माहिती गुप्त सूत्रांनी दिली आहे.
या पैशातून सुमारे ३ लाख रुपये २६ क्विंटल स्फोटक साहित्य खरेदीसाठी वापरले गेल्याचेही उघड झाले आहे. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या या रासायनिक मिश्रणाचा उपयोग स्फोटके तयार करण्यासाठीही होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तपासात आणखी एक मुद्दा समोर आला आहे, डॉ. उमर आणि डॉ. शाहीन यांच्यात पैशाच्या वाटपावरून वाद झाला होता. डॉ. मुझम्मिलने तपास पथकाला दिलेल्या माहितीमुळे संपूर्ण आर्थिक जाळ्याचा मागोवा घेणे सुलभ झाले, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
घटनास्थळावरून तीन ९ मिमी कॅलिबरची काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी दोन जिवंत असून एक वापरलेले आहे. 9 मिमी कॅलिबरची शस्त्रे साधारणपणे सुरक्षा दलांकडे असतात आणि सामान्य नागरिकांना ती बाळगण्यास परवानगी नसते. मात्र, पिस्तूल किंवा त्याचे कोणतेही अवशेष जागेवर सापडले नाहीत, त्यामुळे काडतुसे तिथे कशी आल्या याचा शोध पोलिस घेत आहेत.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काडतुसे सापडली असली तरी संबंधित शस्त्र अद्याप हाती लागलेले नाही. त्यामुळे ती काडतुसे कोणाच्या ताब्यात होती आणि ती तेथे कशी पोहोचली, याचा तपास सुरू आहे.
लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपात नवी एफआयआर दाखल केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.